कर्णधार अमोल जाधवच्या अष्टपैलू खेळ आणि अनुप परब आणि विकास परदेशी यांचे धारदार आक्रमण याच्या बळावर अहमदनगर हीरोजनी खो-खो प्रीमिअर लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली. हीरोजनी सांगली स्मॅशर्सना २०-१४ असे नमवले. शिवाजी पार्क येथील प्रमोद गावंड क्रीडानरीत झालेल्या लढतीत सांगलीचा कर्णधार युवराज जाधव (४ बळी) आणि सुमीत पाटील (१ मि, १.५० मि आणि ४ बळी) अशी चांगली कामगिरी केली. मात्र त्यांना अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही. अहमदनगर हीरोजसाठी अमोल जाधवने दणक्यात सुरुवात करताना काही सेकंदातच पहिला बळी टिपला. अहमदनगरने अतिशय वेगवान आक्रमण केले. मध्यंतराला त्यांनी १२-८ अशी आघाडी घेतली. सांगलीनेही युवराज जाधवकरवी दहा सेकंदात पहिला बळी टिपला. या वेळी लढत जोरदार होईल, अशी अपेक्षा होती. परंतु तीन मिनिटांत ५ प्रतिस्पर्धी टिपल्यानंतर त्यांचा वेग मंदावला. अहमदनगरच्या अनुप आणि अमोलने चांगले संरक्षण करत पडझड रोखली. शेवटच्या डावामध्ये विजयासाठी १३ गुण मिळवू पाहणाऱ्या सांगली स्मॅशर्सचे आव्हान चार मिनिटे शिल्लक असतानाच संपले.

Story img Loader