विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यात संमिश्र कामगिरी केली आहे. टी-२० मालिका ५-० ने जिंकलेल्या भारतीय संघाला वन-डे मालिकेत ३-० ने पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र भारतीय संघासाठी यंदाच्या वर्षी वन-डे सामन्याचा निकाल महत्वाचा नसल्याचं सांगत कर्णधार विराट कोहलीने मोठं वक्तव्य केलं. भारतीय संघासाठी टी-२० आणि कसोटी सामने महत्वाचं असल्याचं विराटने स्पष्ट केलं. आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे यंदा कसोटी सामन्यांना अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. भारतीय कसोटी संघाचा स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजारानेही कसोटी क्रिकेटबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

“ज्यावेळी तुम्ही कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकाल…माझ्यादृष्टीने ही वन-डे आणि टी-२० विश्वचषक जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. कसोटी हा क्रिकेटचा सर्वोत्तम प्रकार आहे. तुम्ही कोणत्याही जुन्या क्रिकेटपटूंना विचाराल तर ते देखील तुम्हाला हेच सांगतिल. कसोटी क्रिकेट हे आव्हानात्मक आहे…आणि या प्रकारात जर तुम्ही विजेतेपद मिळवलंत तर त्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नसेल”, पुजारा India Today वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – टीम इंडियाची ताकद वाढली, इशांत शर्मा फिटनेस टेस्ट पास

आयसीसी कसोटी अजिंक्यप स्पर्धेत भारतीय संघाने खेळलेल्या आतापर्यंतच्या सामन्यात एकही सामना गमावला आहे. गुणतालिकेत भारतीय संघाने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाला आपली आघाडी आणखी वाढवण्याची संधी आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader