हरेंद्र सिंह, कनिष्ठ राष्ट्रीय प्रशिक्षक
महाराष्ट्रात हॉकीसाठी विपुल नैपुण्य आहे. या मातीमधून बाबू निमल, के.डी.जाधव, धनराज पिल्ले यांच्यासारखे महान खेळाडू तयार झाले आहेत. त्यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता असलेले खेळाडू तयार करण्याची माझी इच्छा आहे, असे भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी सांगितले.
लखनौ येथे नुकत्याच झालेल्या कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघास विजेतेपद मिळाले. पंधरा वर्षांंनी भारताने या स्पर्धेच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यांच्या या यशात हरेंद्रसिंह यांचा सिंहाचा वाटा होता. संघाच्या कामगिरीविषयी व आगामी नियोजनाबाबत त्यांनी ‘लोकसत्ता’शी केलेली बातचीत.
विश्वविजेतेपद मिळविण्याबाबत आत्मविश्वास होता का ?
हो निश्चितच. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मी विश्वविजेतेपद मिळविण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. दोन वर्षांपूर्वी आमच्या संघाने सुलतान जोहर चषक स्पर्धा जिंकली होती. त्या स्पर्धेत आम्ही ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांच्यासह अनेक बलाढय़ संघांचा धुव्वा उडविला होता. या संघातील बरेचसे खेळाडू लखनौ येथील विश्वचषक स्पर्धेच्या वेळी असल्यामुळे मला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची खात्री होती. अर्थात उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया व अंतिम लढतीत बेल्जियम यांच्याविरुद्ध विजय मिळविताना आम्हाला संघर्ष करावा लागला.
घरच्या मैदानावर खेळण्याचे दडपण होते का?
मुळीच नाही. किंबहुना घरच्या मैदानावर खेळण्याचा आम्हाला शंभर टक्के फायदाच झाला. कारण मैदान, वातावरण याचा आम्हाला भरपूर सराव होता. तसेच चाहत्यांचा पाठिंबा ही आणखी एक जमेची बाजू होती. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना आमच्या खेळाडूंनी कोणतेही दडपण घेतले नव्हते. उलट आमचे खेळाडू पहिल्या सामन्यापासूनच येथे विजेतेपद मिळविण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवीत खेळले. आमच्या खेळाडूंनी सतत सकारात्मक वृत्तीनेच खेळ केला. त्यामुळे आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकलो.
विजेतेपदाचे श्रेय प्रामुख्याने कोणाला द्यावे लागेल?
संघातील प्रत्येक खेळाडू व अन्य सहयोगींपैकी सर्वाचाच या अजिंक्यपदात वाटा आहे. केवळ स्पर्धात्मक सराव उपयोगी नसतो. त्याच्याबरोबरच पूरक सराव, आहार, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, वैद्यकीय तज्ज्ञांची मदत आदी सर्वच गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. मायदेशात ही स्पर्धा असल्यामुळे संघातील प्रत्येक घटक अतिशय उत्साहाने काम करीत होता. अर्थात परदेशात ही स्पर्धा झाली असती तरीही आम्ही विजेतेपद मिळविले असते कारण गेल्या दोन वर्षांमध्ये आमच्या संघाची मजबूत बांधणी झाली आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँन्ट ओल्टमन्स यांच्याविषयी काय सांगता येईल?
मुलखावेगळा प्रशिक्षक व उत्तम गुरू अशीच मी त्यांना उपाधी देऊ शकेल. गेल्या सात आठ वर्षांमध्ये भारतीय हॉकीचा चेहरामोहरा बदलला आहे. त्याचे श्रेय ओल्टमन्स तसेच हॉकी इंडियाचे सर्वेसर्वा असलेले नरेंदर बात्रा यांना द्यावे लागेल. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली देशात पुन्हा हॉकीविषयी आपुलकी निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी बात्रा हे मोठय़ा फरकाने निवडून आले आहेत. जागतिक स्तरावर भारतीय हॉकी क्षेत्राचा दबदबा वाढला आहे. लखनौ येथील विश्वचषक स्पर्धेत आमच्या अंतिम लढतीच्या वेळी वीस हजारहून
अधिक प्रेक्षक उपस्थित होते. ही हॉकीच्या प्रसाराचीच पावती आहे. आणखी दोन वर्षांनी आपल्या देशात वरिष्ठ गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
हॉकी इंडिया लीगमध्ये भाग घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नेदरलँड्स आदी देशांचे अव्वल खेळाडू उत्सुक असतात. हे लक्षात घेता संघटना स्तरावरही आपले संघटक चांगले काम करीत आहेत याचीच ही प्रचिती आहे.
पेनल्टी कॉर्नरबाबत अजूनही दुबळेपणा जाणवतो काय?
लखनौ येथील स्पर्धेत केवळ आमचे खेळाडू नव्हे तर अन्य देशांच्या खेळाडूंमध्येही या तंत्राबाबत कमकुवतपणा दिसून आला होता. उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघातील खेळाडूंनी पेनल्टी स्ट्रोकच्या तीन संधी दवडल्या होत्या. अंतिम सामन्यात जरी आम्ही पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करू शकलो नाही तरी हा सामना अर्थात आम्ही किती गोलांच्या फरकाने जिंकलो याला महत्त्व नसून आम्ही विश्वविजेते झालो यालाच जास्त महत्त्व आहे.
विश्वविजेतेपद मिळाले आता पुढचे ध्येय कोणते आहे?
आगामी चार वर्षांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा, वरिष्ठ जागतिक स्पर्धा, आणखी चार वर्षांनी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा आदी प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या दृष्टीने आमची तयारी आतापासूनच सुरू आहे. माझ्या कनिष्ठ संघातील अनेक खेळाडूंना वरिष्ठ संघात स्थान मिळण्याची संधी आहे. विश्वविजेते खेळाडू मी घडवू शकतो, असा आत्मविश्वास मला वाटू लागला आहे. महाराष्ट्रात मी यापूर्वी हॉकीसाठी भरपूर काम केले आहे. तेथे असलेले नैपुण्य लक्षात घेऊन त्यांच्याकरिता काम करण्याची माझी इच्छा आहे. तेथील राज्य शासन, प्रायोजक व हॉकी संघटक यांच्या सहकार्याने मी या राज्यामधून ऑलिम्पिकपटू घडवू शकेन अशी मला खात्री आहे.