आपिया आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीने सातत्यपूर्ण खेळ करताना सलग ३० सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम प्रस्तापित केला. भारत-स्वित्र्झलडच्या या जोडीने आपिया आंतरराष्ट्रीय टेनिस स्पध्रेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात सानिया-मार्टिनाने ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना कॅरोलीन गार्सिया आणि क्रिस्टीना मॅलडेनोव्हिक या फ्रान्सच्या जोडीवर १-६, ७-५, १०-५ असा एक तास १३ मिनिटे चाललेल्या सामन्यात विजय मिळवला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेली सानिया-मार्टिना जोडी १-६ व १-४ अशी पिछाडीवर होती. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्यांच्याकडून असलेल्या दमदार पुनरागमनाच्या आशांवर १-४ अशा पिछाडीने पाणी फेरले, परंतु प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेल्या या जोडीने अप्रतिम खेळ करत दुसऱ्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी मिळवली. या बरोबरीमुळे मनोबल उंचावलेल्या सानिया-मार्टिनाने दुसरा सेट ७-५ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. निर्णायक सेटमध्ये या जोडीने ८-३ अशी आघाडी घेतली होती, परंतु फ्रान्सच्या जोडीने संघर्ष केला. अखेरीस अमेरिकन आणि विम्बल्डन स्पध्रेतील विजेत्या जोडीने १०-५ अशा फरकाने सेट जिंकून जेतेपद पटकावले. या जोडीने सलग तीस सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे.
बोपण्णा-मग्रेआ जोडी अंतिम फेरीत
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरीन मर्गेआ यांनी आपिया आंतरराष्ट्रीय टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित बोपण्णा-मर्गेआ
जोडीने उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्राझीलच्या थॉमझ बेलूस्सी आणि अर्जेटिनाच्या लीओनाडरे मेयर जोडीवर ७-६ (८), ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचा जॅमी मरे आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोआरेस या जोडीचे आव्हान आहे.

११ : सानिया-मार्टिना जोडीने २०१५च्या हंगामातील स्वप्नवत वाटचाल कायम राखताना २०१६मध्ये ब्रिस्बेन स्पध्रेपाठोपाठ आपिया आंतरराष्ट्रीय स्पध्रेचेही जेतेपद पटकावले. या जोडीचे हे अकरावे जेतेपद आहे.
१९९४ : प्युअटरे फर्नाडिझ व नताशा व्हेराव्हा जोडीने १९९४ मध्ये सलग २८ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम केला होता. २२ वर्षांनंतर सानिया-मार्टिना जोडीने हा विक्रम मोडला.

 

Story img Loader