..हा गोल योग्य होता की अयोग्य?.. अशा प्रकारची चर्चा पुढील पाच आठवडे तरी फुटबॉलविश्वामध्ये होण्याची सुतराम शक्यता नाही.. कारण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत यंदा प्रथमच गोलरेषा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. विश्वचषकाचे सामने होणाऱ्या १२ स्टेडियमवरील प्रत्येक गोलपोस्टचे सात कॅमेरे वेध घेणार आहेत. हे कॅमेरे प्रत्येक सेकंदाला सुमारे ५०० छायाचित्रे टिपतात आणि संगणकाद्वारे त्यांचे निरीक्षण करता येऊ शकते. सेकंदाच्या आत फुटबॉल गोलरेषा ओलांडतो आणि रेफरी ‘गोल’ नमूद करतो. परंतु त्यानंतरही त्याबाबतचे वादविवाद चर्चेत राहतात. मात्र आता या वादांना कायमचा अलविदा केला जाणार आहे.
ब्राझीलमध्ये २४०० चाचण्यांनंतर या तंत्रज्ञानाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. कोणत्याही चुका अथवा त्रुटी प्रकट न झाल्यामुळे यावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. रिओ येथील माराकाना स्टेडियमवर सोमवारी गोलरेषा तंत्रज्ञानाची रंगीत तालीम घेण्यात आली. जर्मनीस्थित ‘गोलकंट्रोल’ या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याचे प्रमुख डर्क ब्रोइचॉसेन यांनी ‘हे भविष्य आहे’ असे यावेळी म्हटले.
२०१०च्या विश्वचषक स्पध्रेतील इंग्लंड आणि जर्मनी यांच्यातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात फ्रँक लॅम्पडच्या किकने फुटबॉल क्रॉसबारवर आदळून गोलरेषेला स्पर्श करून बाहेर पडला होता. परंतु रेफरीला ती निदर्शनास न आल्यामुळे हा गोल देण्यात आला नव्हता. हा गोल दिला गेला असता, तर इंग्लंडला त्यावेळी २-२ अशी बरोबरी साधता आली असती. पण हा वादग्रस्त सामना अखेरीस जर्मनीने ४-१ अशा फरकाने जिंकला होता.
‘‘बऱ्याचदा रेफरीलासुद्धा गोल देणे कठीण जाते. त्यामुळे हे तंत्रज्ञान सर्वानाच उपयुक्त ठरेल,’’ असा दावा फिफाच्या जोहानीस होल्झमुलर यांनी केला आहे.
‘‘गोलरेषा तंत्रज्ञान निराळ्या प्रकारे क्लब फुटबॉल स्पर्धामध्ये वापरण्यात आले आहे. प्रीमियर लीगच्या मागील हंगामात त्यासाठी ‘हॉक-आय’ पद्धतीचा वापर करण्यात आला होता. परंतु गोलनियंत्रण पद्धती अधिक विश्वासार्ह आहे. सातही कॅमेऱ्यांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न जरी खेळाडूंकडून झाला तरी या तंत्रज्ञानावर त्याचा परिणाम होणार नाही,’’ असे हॉल्झमुलर यांनी सांगितले.