भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू सोमदेव देववर्मन याला दुहेरीत पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान शनिवारी संपुष्टात आले. थायलंडच्या सांचाल व सोनचात रतिवाताना या बंधूंनी सोमदेव व त्याचा युक्रेनियन सहकारी सर्जी स्टाखोवस्की यांना ६-३, ७-५ असे पराभूत केले.
रतिवाताना जुळ्या भावांनी सोमदेव व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध ६६ मिनिटांमध्ये विजय मिळविला. त्यांना आता उपांत्य फेरीत जर्मनीच्या आंद्रे बेगेमान व मार्टिन एमरीच यांच्याशी खेळावे लागणार आहे. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत बेनोट पेअरी (फ्रान्स) व स्टानिस्लास वॉवरिंक (स्वित्र्झलड) यांची रेवीन क्लासेन (रशिया) व निकोलस मोनरोई (अमेरिका) यांच्याशी गाठ पडणार आहे.
भारताच्या महेश भूपती व त्याचा कॅनेडियन सहकारी डॅनियल नेस्टॉर यांना शुक्रवारी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांना क्लासेन व मोनरोई यांनी ६-४, ७-५ असे पराभूत केले होते. भारताच्या अन्य खेळाडूंचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले होते.
स्पेनचा अपरिचित खेळाडू रॉबर्ट बाटिस्टा अ‍ॅगूट याने अग्रमानांकित थॉमस बर्डीच याच्यावर मात करीत चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी सनसनाटी विजय मिळविला. त्याने हा सामना ७-५, ६-२, ६-३ असा जिंकला. बर्डीच याला जागतिक क्रमवारीत सहावे मानांकन आहे. उपांत्यपूर्व फेरीतील १३९ मिनिटांच्या लढतीनंतर अ‍ॅगूट याने चतुरस्र  खेळाचा प्रत्यय घडवित हा सामना जिंकला.  द्वितीय मानांकित जान्को तिप्सेरविक याने उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. मात्र मेरीन सिलिक (क्रोएशिया) व स्टानिस्लास वॉविरक (स्वित्र्झलंड) यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
बर्डीचने केलेल्या अक्षम्य चुकांचा पुरेपूर फायदा घेत अ‍ॅगूटने सामन्यावर वर्चस्व गाजविले. त्याने पहिल्या सेटमध्ये बाराव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. त्याने पासिंग शॉट्सचा सुरेख खेळ केला. पहिला सेट घेतल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या अ‍ॅगूटने नंतरच्या दोन सेट्समध्ये बर्डीचला फारशी संधी दिली नाही. त्याने जमिनीलगत परतीचे खणखणीत फटके मारले तसेच नेटजवळून प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला.

Story img Loader