Manoj Tiwary Allegations on Gautam Gambhir : माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मनोज तिवारीने गौतम गंभीरवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. मनोज तिवारी म्हणाला की गौतम गंभीर हा सौरव गांगुलीबद्दल खूप वाईट बोलला होता. त्याचबरोबर त्याने सौरव गांगुलीची खिल्ली उडवली होती, असा दावा मनोज तिवारीने केला आहे. २०१५ मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान गौतम गंभीरचे बंगालचा तत्कालीन कर्णधार मनोज तिवारीसोबत वाद झाला होते. तेव्हापासून या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड वैर आहे.
मनोज तिवारीचा गौतम गंभीरवर आरोप –
‘द ललनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारी म्हणाला, “मला आठवते की सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल मध्ये सामील झाले होते. जेव्हा फिरोजशाह कोटला स्टेडियमवर आमच्यात वाद झाला होता, तेव्हा गौतम गंभीर सौरव गांगुलीबद्दल वादग्रस्त बोलला होता. तो म्हणाला होता की, तो जॅक लावून आला आणि तू पण त्याच्या मागे आला आहेस. मी दादाला याबाबत सांगितल्यावर ते म्हणाल ‘ठीक आहे’. त्यांना सांगणे माझे कर्तव्य होते. तुम्ही पण बघितलंय गंभीरला किती रागाय येतो. त्या दिवसानंतर आम्हाला बोललो किंवा भेटलो नाही.”
केकेआरमध्ये झालेल्या वादानंतर पुन्हा २०१५ साली दोघे आमने-सामने आले होते, तेव्हा दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता. मनोज तिवारीच्या म्हणण्यानुसार, गौतम गंभीरने त्याला त्याच्या आई आणि बहिणीवरुन शिवीगाळ केली होती. मनोज तिवारीने पुढे सांगितले की तो गार्ड घेण्याच्या तयारीत होता (फलंदाजीसाठी तयार), पण यावेळी गौतम गंभीरला वाटले की, तो मुद्धाम वेळ वाया घालवत आहे.
गौतम गंभीर आणि मनोज तिवारीमध्ये का झाला होता वाद?
मनोज तिवारी म्हणाला, “मी लेग गार्ड घालत असताना तो स्लिमध्ये उभा होता आणि शिवीगाळ करू लागला. अशी शिवी जी मी सांगू पण शकत नाही. मी कधीही माझ्या आई किंवा बहिणीवरुन अशी कोणाकडूनही शिवीगाळ ऐकली नव्हती आणि केली पण नव्हती. यानंतरही मी रागावर संयम ठेवत त्याला विचारले गौती भाऊ शिव्या का देतोयस? यावर तो म्हणाला, मला संध्याकाळी भेट तुला दाखवतो, त्यानंतर मी संध्याकाळी कशाला आताच दाखवना. यानंतर पंच आले आणि वाद थांबवला.”