भारतीय वन-डे संघाची सलामीची जोडी म्हणजे रोहित शर्मा आणि शिखर धवन. आयपीएल सुरु होण्यापूर्वीचे काही सामने आणि २०१८ हे वर्ष या जोडीने गाजवलं. ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी या दोन्ही खेळाडूंचं फॉर्मात असणं भारतीय संघासाठी महत्वाचं मानलं जातंय. या जोडीने भारताला अनेकदा चांगली सुरुवात करुन दिली असली तरीही त्यांच्या कामगिरीतलं सातत्य हा नेहमी वादाचा मुद्दा राहिलेला आहे.

अवश्य वाचा – हार्दिक पांड्यासारखा प्रतिभावान खेळाडू भारतीय संघात नाही – विरेंद्र सेहवाग

कामगिरीतल्या सातत्याविषयी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना शिखर धवनने मात्र पत्रकारांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. “सातत्या कायम राखण्यासाठी बोलायची गरज काय, रोहित माझी बायको नाहीये. एखाद्या खेळाडूसोबत तुम्ही अनेक वर्ष खेळत असता तेव्हा त्याची ओळख तुम्हाला होते. मी आणि रोहित फलंदाजी करत असताना वेगळं काहीही करत नाही. आम्ही फक्त सकारात्मक मानसिकतेने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. रोहितच्या जागी मी पृथ्वी शॉसोबत फलंदाजीला आलो तरीही ही गोष्ट कायम राहणार आहे. एखाद्या खेळाडूने जर चांगली सुरुवात केली तर दुसरा त्याला साथ देण्याचं काम करतो.” शिखर IANS वृत्तसंस्थेशी बोलत होता.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही रोहित शर्मा – शिखर धवन जोडीचं कौतुक केलं आहे. भारताची सलामीची जोडी सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट जोडी असल्याचं म्हटलं होतं. ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

अवश्य वाचा – रोहित-शिखर धवन सर्वोत्कृष्ट सलामीची जोडी, प्रशिक्षक रवी शास्त्रींकडून पोचपावती

Story img Loader