ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचूनही नेहमीच त्यापासून दूर राहणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांत आज, बुधवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना पुण्यात गहुंजेच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मैदानावर होणार आहे. यंदाही अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांनी दावेदारी सिद्ध केली आहे. मात्र, त्याआधी उपांत्य फेरी गाठण्यासाठी आणि गुणतालिकेतील स्थानांसाठी दोन्ही संघांमध्ये चुरस आहे. या दोन्ही आघाडय़ांवरील शर्यत म्हणूनच या सामन्याकडे बघितले जाईल.

या सामन्यात विजयाचे महत्त्व दोन्ही संघांसाठी वेगळे असेल. दक्षिण आफ्रिका जिंकल्यास त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल, तर न्यूझीलंड जिंकल्यास त्यांना उपांत्य फेरी प्रवेशासाठी आत्मविश्वास मिळेल. त्यामुळेच आधीच्या सामन्याचा काय निकाल लागला हे विसरून दोन्ही संघ नव्याने या सामन्यात उतरतील. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेने सहापैकी पाच, तर न्यूझीलंडने चार सामने जिंकले आहेत.

फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर या दोन संघांची ताकद समान आहे. मोठी धावसंख्या उभारणे किंवा आव्हानाचा पाठलाग करणे यासाठी फलंदाजीचा पुरेसा लावाजमा दोन्ही संघात आहे. पण, आवश्यक असणारी ऊर्जा आणि तेवढा भेदक गोलंदाजीचा तोफखाना असला, तरी सामन्याच्या रणभूमीवर तो चालेलच असे नाही. स्पर्धेत फिरकी गोलंदाजांचे महत्त्व वाढत चालले आहे. गहुंजे येथील स्टेडियमच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना फारशी मदत मिळत नसली, तरी टप्पा आणि दिशा अचूक राखल्यास फलंदाजांवर अंकुश ठेवता येतो हे अफगाणिस्तानने सोमवारी दाखवून दिले आहे. मैदानही छोटे असल्यामुळे फलंदाजांनाच आता अधिक भार उचलावा लागेल आणि तेवढी क्षमता या दोन्ही संघांत आहे.

हेही वाचा >>>IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल होणार? खेळण्याबाबत संघ व्यवस्थापनाने दिले अपडेट्स

दक्षिण आफ्रिका 

’दक्षिण आफ्रिका फलंदाजीत क्विंटन डिकॉक, टेम्बा बव्हुमा, एडीन मार्करम, क्लासन, डेव्हिड मिलर, रासी व्हॅन डर डसेन असा ताफा बाळगून आहे. गहुंजेच्या मैदानावर त्यांच्या फटक्यांची आतषबाजी बघायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

’कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सन आणि जेराल्ड कोएट्झी या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची कामगिरी तेवढीच निर्णायक ठरणार आहे.

’दक्षिण आफ्रिकेकडे केशव महाराज आणि तबरेझ शम्सी हे गुणवान फिरकी गोलंदाज आहेत. फक्त खेळपट्टीच्या स्वरूपानुसार दक्षिण आफ्रिका दोन फिरकी गोलंदाजी खेळवायचे की नाही याचा निर्णय घेईल.

हेही वाचा >>>विराटने केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, “अनुष्का आई म्हणून आदर्शच, तिने जो त्याग…”

न्यूझीलंड 

’न्यूझीलंडकडे डेव्हॉन कॉन्वे, रचिन रिवद्र, डॅरेल मिचेल, विली यंग, ग्लेन फिलिप्स असे शिलेदार आहेत. रचिनने यंदाच्या स्पर्धेत दोन शतके झळकावताना चमक दाखवली आहे.

’न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट, लॉकी फग्र्युसन, मॅट हेन्री आणि जिमी नीशम यांसारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. बोल्टची कामगिरी महत्त्वाची ठरेल.

’सध्याच्या स्पर्धेत हमखास निर्णायक ठरणारे फिरकीचे अस्त्र चालवण्यासाठी न्यूझीलंडचा मिशेल सँटनर सज्ज आहे. गेल्या सामन्यात त्याला ग्लेन फिलिप्सची उत्तम साथ लाभली. शिवाय न्यूझीलंडकडे ईश सोधीचा पर्यायही उपलब्ध आहे.

वेळ : दुपारी २ वा.  ल्लथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wold cup 2023 new zealand vs south africa important semi final match sport cricket news amy