पीटीआय, नवी दिल्ली
क्रिकेट सामन्यांवर पावसाचे सावट असल्याचे अनेकदा ऐकायला किंवा वाचायला मिळते. परंतु एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नवी दिल्ली येथे आज, सोमवारी होणाऱ्या बांगलादेश-श्रीलंका सामन्यावर धुरक्याचे सावट असून, हवेच्या गुणवत्तेने धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा सामना खेळवायचा की नाही, याबाबत निर्णय आज सकाळी घेतला जाणार आहे.
राजधानी दिल्लीतील प्रदूषणाने अतिधोकादायक स्तर ओलांडला आहे. सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि साहाय्यकांना मुखपट्टीचा वापर करावा लागत आहे. या प्रदूषित हवेमुळे वैद्यकीय पथकाचे काम वाढले आहे. बांगलादेश-श्रीलंका संघाने शुक्रवारी नियोजित सराव न करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशाच्या खेळाडूंनी शनिवारी सायंकाळी, तसेच रविवारी दुपारी मुखपट्टी लावून सराव केला. मात्र, राजधानीतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० या चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. ही परिस्थिती मंगळवापर्यंत अशीच राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
एकूण परिस्थितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दडपणाखाली आहे. त्यांना सामना अन्यत्र हलवता येणार नाही. त्यामुळे परिस्थिती न सुधारल्या सामना रद्द करावा लागू शकतो. हवेच्या गुणवत्तेचा अंदाज घेऊन पंच सामन्याच्या आयोजनाबाबतचा निर्णय घेतील, असे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>>IND vs SA: हिटमॅनला सर्वाधिक वेळा बाद करणारा रबाडा ठरला पहिला गोलंदाज, रोहित-शुबमनने केला ‘हा’ विक्रम
कामगिरी उंचावणे गरजेचे
श्रीलंकेला गेल्या सामन्यात भारताकडून ३०२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर बांगलादेशला पाकिस्तानने सात गडी राखून नमवले होते. त्यामुळे आज सामना खेळवण्याचा निर्णय झाल्यास श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांना आपला खेळ उंचवावा लागेल. श्रीलंकेची मदार कर्णधार कुसाल मेंडिस, पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका यांच्यावर असेल. तर बांगलादेशला विजय मिळवायचा झाल्यास कर्णधार शाकिब अल हसनला चमकदार कामगिरी करावी लागेल.
हवेतील या दुषित धुरक्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना त्रास होणार आहे. ही परिस्थिती खेळण्यासाठी निश्चित अनुकूल नाही. असे असले तरी या सामन्याचा निकाल चॅम्पियन्स करंडक पात्रतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकेल. श्रीलंका आणि बांगलादेश या दोनही संघांची सध्या समानच स्थिती आहे. आम्ही स्पर्धेची चांगली सांगता करण्याचा प्रयत्न करू. – चंडिका हथुरुसिंघे, बांगलादेशचे प्रशिक्षक
’ वेळ : दुपारी २ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदू