भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू राजेश्वरी गायकवाड हिची गणना सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. राजेश्वरीने तिच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर अलीकडच्या काळात भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. पण या सगळ्यामध्ये राजेश्वरी गायकवाड एका मोठ्या वादात अडकली आहे. वास्तविक, हे प्रकरण कर्नाटकातील विजयपूरचे आहे, जिथे राजेश्वरी एका सुपरमार्केटमध्ये एका कर्मचाऱ्याशी वाद घालताना दिसली आहे.
महिला क्रिकेटर सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यासाठी एका मार्केटमध्ये पोहोचली होती. राजेश्वरी गायकवाडला वस्तूच्या किमतीबाबत खूश नसल्याने दुकानदाराशी जोरदार वाद झाला. त्यानंतर या वादाला नंतर हिंसक वळण लागले. तसेत काही वेळाने तिच्या जवळच्या काही जणांनी सुपरमार्केटमध्ये घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर हा सगळा प्रकार तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
सीसीटीव्ही फुटेज शेअर करताना, सुपरमार्केटच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे ठरवले होते. परंतु नंतर दोन्ही पक्षांनी पोलिस तक्रार न नोंदवता शांततेत प्रकरण मिटवले. विजयपूरचे पोलीस अधिकारी आनंद कुमार म्हणाले की, एफआयआरची कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. पण पुढे जाऊन तक्रार नोंदवली गेली, तर मात्र राजेश्वरीच्या अडचणी वाढू शकतात.
राजेश्वरीने २०१४ साली डावखुरा फिरकीपटू म्हणून पदार्पण केले. तिने १९ जानेवारी २०१४ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्याद्वारे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. राजेश्वरी २०१७ च्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाचा देखील एक भाग राहिली आहे. मात्र, भारताला इंग्लंडकडून पराभूत झाल्यामुळे त्यांनी ट्रॉफी पटकावण्याची संधी गमावली. त्या स्पर्धेत राजेश्वरीने न्यूझीलंडविरुद्ध १५ धावांत ५ बळी घेतले होते.