येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जवळपास ७२ देशांतील पाच हजार ५४ खेळाडू सहभाग घेण्याची शक्यता आहे. या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने महिला चमूची आज घोषणा केली आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कास्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. याशिवाय, गेल्या महिन्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची सुवर्णपदक विजेती निखत जरीन, युवा विश्वविजेती नीतू आणि जास्मिन यांचाही भारतीय महिला बाक्सिंग चमूमध्ये सहभाग झाला आहे. विशेष म्हणजे मागील राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती आणि सहा वेळची विश्वविजेती एमसी मेरी कोम आणि एल सरिता देवी यांचा या चमूमध्ये समावेश नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज (शनिवार) राष्ट्रीय चाचण्यांची अंतिम फेरी पार पडली. या फेरीमध्ये एकूण चार वजन गटांतील सामने घेण्यात आले. टोक्यो ऑलिम्पिकची कास्यपदक विजेती बॉक्सर लोव्हलिना हिने राष्ट्रीय चाचण्यांतील अंतिम सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला. ७० किलो वजनीगटामध्ये २४ वर्षीय लोव्हलिनाने प्रतिस्पर्धी पूजाचा ७-० असा पराभव केला.

त्याचबरोबर गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या निखत जरीननेही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. तिने ५० किलो वजनी गटात मीनाक्षीचा ७-० असा एकतर्फी पराभव केला. युवा विश्वविजेत्या नीतूने ४८ किलो वजनी गटात मंजू राणीचा ५-२ असा पराभव केला. तर, ६० किलो वजनी गटात १६ वर्षीय बॉक्सर, जास्मिनने विश्वविजेती असलेल्या परवीनचा ६-१ असा पराभव करत पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आपले तिकीट पक्के केले.

दरम्यान, २०१८मधील राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती एमसी मेरीकोम राष्ट्रीय चाचण्यांच्या उपांत्य फेरीत जखमी झाली. त्यामुळे तिला माघार घ्यावी लागली. मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात माघार घेतल्याने नीतूला विजेता घोषित करण्यात आले होते.

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ६६ पदके जिंकली होती. यामध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कास्यपदकांचा समावेश होता. तर, बॉक्सिंगमध्ये भारताने एकूण नऊ पदके जिंकली होती. यामध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कास्यपदकांचा समावेश होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women boxing squad for commonwealth games 2022 has been announced vkk