महिला क्रिकेटपटूंना अजूनही काही ठिकाणी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. प्रसिद्धी व प्रायोजक या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जर चांगली प्रसिद्धी मिळाली तर आपोआप प्रायोजक मिळतात. दुर्दैवाने महिला क्रिकेटला प्रसारमाध्यमे व सामाजिक माध्यमांवरही अपेक्षेइतकी प्रसिद्धी मिळत नाही.

भारतीय क्रिकेट म्हणजे पुरुष खेळाडूंची मक्तेदारी गाजवण्यासाठी असलेले क्षेत्र मानले जाते. फक्त पुरुष खेळाडूंनाच वलयांकित खेळाडू होण्याचा अधिकार आहे असा गैरसमज आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने ‘न भूतो, न भविष्यति’ अशी कामगिरी करीत आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांची ही झेप सर्वानाच धक्का देणारी आहे. महिला क्रिकेटचे व्यवस्थापन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे आल्यानंतर गेल्या सात-आठ वर्षांमध्ये महिला खेळाडूंची स्थिती सुधारली आहे. असे असले तरीही अजूनही महिला क्रिकेटपटूंना अपेक्षेइतकी समान वागणूक मिळत नाही.

भारतीय महिला संघ या स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवेल अशी कोणी आशाही केली नसेल. महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आदी देशांचे वर्चस्व असताना भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला तरी खूप होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्व आघाडय़ांवर सातत्यपूर्ण कामगिरी करीत लागोपाठ आश्चर्यजनक धक्के दिले आहेत. आफ्रिकेचा अपवाद वगळता त्यांनी उर्वरित तिन्ही बलाढय़ संघांवर मात केली आहे. ही मजल गाठताना स्मृती मंधाना, मिताली राज व हरमनप्रीत कौर यांनी केलेल्या शतकी खेळी सर्वासाठी संस्मरणीय आहेत. मितालीने दोन शतकांसह एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सहा हजारांहून अधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे. हरमनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत नाबाद १७१ धावांच्या केलेल्या खेळीने चाहत्यांना कपिल देवने १९८३ मध्ये इंग्लंडमध्येच केलेल्या पावणेदोनशे धावांच्या खेळीची आठवण करून दिली.

भारतीय महिला संघाने केलेली ही प्रगती खरोखरीच कौतुकास्पद आहे. क्रिकेट हा धर्म मानला जाण्याइतके प्रेम भारतीय लोक या खेळावर करीत असतात. एक वेळ खायला पोटभर मिळाले नाही तरी चालेल, पण आयपीएलचा सामना पाहण्यासाठी शेकडो रुपये खर्च करणारे लोक आपल्या देशात आहेत. पुरुष खेळाडूंना आयपीएलच्या एका मोसमाकरिता कोटय़वधी रुपयांची कमाई होते. त्यांना पंचतारांकित निवास व अन्य भरपूर सुविधा मिळतात. नोकरीच्या ठिकाणीही त्यांना पगारी रजा मिळते. त्या तुलनेत भारतीय महिला खेळाडू उपेक्षितच मानल्या जातात. विशेषत: विविध स्पर्धासाठी होणारा प्रवासखर्च, निवास व्यवस्था, सामन्यांची मैदाने याबाबत महिला खेळाडूंना अजूनही काही ठिकाणी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. प्रसिद्धी व प्रायोजक या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जर चांगली प्रसिद्धी मिळाली तर आपोआप प्रायोजक मिळतात. दुर्दैवाने महिला क्रिकेटला प्रसारमाध्यमे व सामाजिक माध्यमांवरही अपेक्षेइतकी प्रसिद्धी मिळत नाही.

आयपीएल स्पर्धा सुरू होऊन दहा वर्षांचा कालावधी झाला आहे, मात्र अद्याप महिलांसाठी तशी स्पर्धा आयोजित करण्याचे प्रयत्न कोणी केलेले नाही. जर असा प्रयत्न झाला तर परदेशातील अनेक महिला खेळाडू या स्पर्धेत भाग घेतील व या स्पर्धाना प्रसिद्धी मिळाली तर आपोआपच महिला खेळाडू व क्रिकेटची प्रगती होऊ शकेल. अधिकाधिक सामने खेळायला मिळाले तरच या खेळाडूंचा अनुभव समृद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियात बिग बाश स्पर्धेत महिलांकरिता स्वतंत्र सामने आयोजित केले जातात. हरमनला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. तेथील अनुभवाचा फायदा तिला आयसीसी स्पर्धेसाठी झाला आहे. तशीच संधी अन्य भारतीय खेळाडूंना मिळाली तर आपोआपच भारतीय खेळाडूंची कामगिरी सातत्याने अव्वल दर्जाची होऊ शकेल.

भारतीय महिला संघासाठी प्रशिक्षक म्हणून माजी रणजीपटू तुषार आरोटे यांचे नाव जाहीर झाले, त्या वेळी ही व्यक्ती कोण? असा अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र प्रसिद्धीचे फारसे वलय न लाभलेल्या या प्रशिक्षकाने अतिशय मनापासून कष्ट घेत भारतीय महिला संघाची उभारणी केली आहे. भारतीय महिला संघाने केलेल्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीवर कार्यरत असलेल्या डायना एडलजी या स्वत: भारताच्या माजी कर्णधार आहेत. महिला संघाने केलेली प्रगती प्रेरणादायकच आहे. महिला क्रिकेटच्या सर्वागीण विकासाकरिता व समान सुविधांसाठी त्या आश्वासक पावले उचलतील अशी आशा आहे. महिला क्रिकेट हे बीसीसीआयकरिता लोढणे वाटू न देता त्यांच्याकडेही जगज्जेतेपद मिळवण्याची क्षमता आहे, हे ओळखूनच त्याप्रमाणे या खेळाडूंना योग्य न्याय दिला पाहिजे.

milind.dhamdhere@expressindia.com