वृत्तसंस्था, सिडनी
महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला आज, रविवारी नवविजेता लाभणार असून इंग्लंड आणि स्पेन या संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. इंग्लंडच्या महिला संघाने एकदाही विश्वचषक जिंकलेला नसून पुरुष संघाने विश्वचषक जिंकून आता ५७ वर्षे उलटली आहेत. त्यामुळे महिला संघाला विजय मिळवण्यात यश आल्यास फुटबॉलचे जन्मस्थान असलेल्या इंग्लंडमध्ये १९६६ नंतर प्रथमच विश्वचषक परतेल. परंतु, त्यासाठी इंग्लंडला स्पेनचे खडतर आव्हान परतवावे लागणार आहे.
इंग्लंड आणि स्पेन हे दोनही महिला संघ प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम लढतीत खेळणार आहेत. २००३ सालानंतर प्रथमच दोन युरोपीय संघांमध्ये महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. त्या वेळी जर्मनीने स्वीडनला नमवले होते. यंदाच्या स्पर्धेत इंग्लंड आणि स्पेन या दोनही संघांनी अप्रतिम कामगिरी केली आहे.
गेल्या हंगामात इंग्लंड महिला संघाने युरोपीय अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. आता त्यांना विश्वचषक जिंकून जगातील सर्वोत्तम महिला फुटबॉल संघ म्हणून लौकिक मिळवण्याची संधी आहे. स्पेनच्या संघाची वाटचालही उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रशिक्षक बदलण्याची मागणी राष्ट्रीय फुटबॉल संघटनेने फेटाळल्यानंतर स्पेनच्या १५ खेळाडूंनी यापुढे खेळण्यास नकार दिला होता. मात्र, एका वर्षांहूनही कमी कालावधीत स्पेनने बहुतांश नवीन खेळाडूंसह संघाची पुनर्बाधणी करताना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता इंग्लंडप्रमाणेच स्पेनचा महिला संघही पहिल्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी उत्सुक आहे.उपांत्य फेरीत इंग्लंडने सह-यजमान ऑस्ट्रेलियाला ३-१ असे, तर स्पेनने स्वीडनला २-१ असे नमवले होते.
पारालुएलोवर स्पेनची भिस्त
स्पेनसाठी १९ वर्षीय सलमा पारालुएलोने गेल्या दोन सामन्यांत निर्णायक भूमिका बजावली आहे. सलमाने उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सविरुद्ध अतिरिक्त वेळेत विजयी गोल केला होता. त्यानंतर उपांत्य फेरीतही तिचा गोल महत्त्वाचा ठरला आणि स्पेनने स्वीडनवर २-१ अशी मात केली. त्यामुळे अंतिम लढतीतही तिच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल.
जेम्सचे पुनरागमन
मध्यरक्षक लॉरेन जेम्सच्या पुनरागमनामुळे इंग्लंडचा संघ अंतिम लढतीत अधिक ताकदीनिशी मैदानावर उतरेल. २१ वर्षीय जेम्सने या स्पर्धेत इंग्लंडसाठी सर्वाधिक तीन गोल आणि तीन गोलसाहाय्य केले आहेत. मात्र, उपउपांत्यपूर्व फेरीत नायजेरियाच्या खेळाडूवर पाय दिल्याने जेम्सला लाल कार्ड दाखवण्यात आले होते आणि ती उपांत्यपूर्व व उपांत्य सामन्यांना मुकली.
स्वीडन संघाला कांस्य
ब्रिस्बेन : स्वीडनने महिला विश्वचषकात शनिवारी झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात सह-यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघावर २-० असा विजय मिळवला. यासह स्वीडनने चौथ्यांदा महिला विश्वचषकात कांस्यपदक पटकावले. स्वीडनकडून फ्रिडोलिना रोल्फो (३०व्या मिनिटाला) आणि कोसोवरे असलानी (६२व्या मि.) यांनी गोल केले. रोल्फोने पेनल्टीवर गोल झळकावला.
’ वेळ : दु. ३.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, फॅनकोड अॅप