एपी, ऑकलंड (न्यूझीलंड)
ओल्गा कार्मोनाने (८९व्या मिनिटाला) केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर स्पेनने मंगळवारी स्वीडनविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात २-१ असा विजय मिळवत महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात स्पेनपुढे यजमान ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.
‘फिफा’ क्रमवारीत सातव्या स्थानी असणाऱ्या स्पेनकडे आता पहिले जागतिक विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. स्पेनविरुद्धच्या पराभवामुळे क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या स्वीडन संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान शाबूत असलेला स्पेन हा क्रमवारीत सर्वात अव्वल संघ आहे. स्वीडनचा विश्वचषक स्पर्धेतील पाचवा उपांत्य सामना होता आणि पाचही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. स्पेन आणि स्वीडन या संघांना ८० मिनिटांपर्यंत एकही गोल करता आला नाही. परंतु, सामन्याच्या अखेरच्या १० मिनिटांत तीन गोल करण्यात आले.सामन्याच्या सुरुवातीपासून स्पेनने चेंडूवर अधिक वेळ ताबा ठेवला. स्पेनने गोल करण्याच्या अनेक संधीही निर्माण केल्या. मात्र, स्वीडनच्या बचाव फळीने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. दुसरीकडे, स्पेनच्या बचाव फळीनेही स्वीडनच्या आघाडीपटूंना रोखले होते. मध्यंतराच्या गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या सत्रात स्वीडनने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या ६३व्या मिनिटाला सलमा पारालुएलोने मारलेला हेडर गोलजाळय़ावरून निघून गेला. स्पेनच्या अल्बा रेडोन्डोनेकडे गोल करण्याची संधी होती, पण तिने ती गमावली.
नेदरलँड्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करणाऱ्या १९ वर्षीय सलमाने स्वीडनविरुद्ध ८१व्या मिनिटाला गोल नोंदवत स्पेनला आघाडी मिळवून दिली. मात्र, हा गोल पंचांनी तपासून पाहिला. त्यामुळे काही काळ सामन्यात तणावाचे वातावरण होते. अखेर स्पेनला गोल बहाल करण्यात आला. मात्र, स्पेनला ही आघाडी फार काळ टिकवता आली नाही. स्वीडनच्या रेबेका ब्लोमक्विस्टने (८८व्या मि.) गोल झळकावत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्यात आणखी चुरस निर्माण झाली. स्वीडनने केलेल्या गोलच्या पुढच्याच मिनिटाला कार्मोनाने त्यांची गोलरक्षक जेसीरा मुसोविचला चकवत गोल केला आणि स्पेनला २-१ असे आघाडीवर नेले. स्पेनसाठी हाच गोल निर्णायक ठरला.
स्पेनच्या संघाने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच स्थान मिळवले.