एपी, मेलबर्न
स्वीडनने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या अमेरिकेला पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ अशा फरकाने नमवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील हा सर्वात मोठा उलटफेर ठरला आहे. चार जेतेपद मिळवणाऱ्या अमेरिकन संघाची ही सर्वात निराशाजनक कामगिरी राहिली. संघाला प्रथम उपउपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला.
सामना सुरू होण्यापूर्वी अमेरिकन संघाला या सामन्यात विजयासाठी पसंती होती. मात्र, स्वीडनने आपला खेळ उंचावताना संपूर्ण सामन्यात अमेरिकन संघाला दडपणाखाली ठेवले. अमेरिकेने आक्रमक खेळ केला, पण त्यांच्या बचावफळीसमोर अमेरिकेचा निभाव लागला नाही. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. यानंतर अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला. स्वीडनने यापूर्वी २०१६ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर अमेरिकेला नमवले होते. या सामन्यानंतर अमेरिकेच्या काही खेळाडूंना अश्रू अनावर झाले.
पेनल्टी शूटआऊटमधील अखेरचा गोल हा स्वीडनकडून हर्टिगने झळकावला. मात्र, अमेरिकेची गोलरक्षक एलिसा नैहरने आपण हर्टिगचा गोल वाचवल्याचे म्हटले. मात्र, पंचांनी त्या गोलला रेषेच्या आत असल्याचे सांगितले आणि तो गोल ग्राह्य धरण्यात आला.अमेरिकेचा संघ महिला विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीपूर्वी स्पर्धेबाहेर गेला.
नेदरलँड्सची दक्षिण आफ्रिकेवर सरशी
’नेदरलँड्सने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २-० असा विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. जिल रूड (नवव्या मिनिटाला) व लिनेथ बीरेनस्टेन (६८व्या मि.) यांनी केलेल्या गोलमुळे संघाने अंतिम आठ फेरीत स्थान मिळवले.
’स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालांची नोंद करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सला सहज विजय मिळवू दिला नाही. नेदरलँड्सची गोलरक्षक डोमसेलरने थेम्बी कगाटलानाने अनेक प्रयत्न हाणून पाडले. नेदरलँड्सचा सामना उपांत्यपूर्व फेरीत स्पेनशी होणार आहे. या सामन्यात स्पेनची तारांकित खेळाडू व्हान डी डोन्कला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने ती या सामन्यात खेळणार नाही.