भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही आशिया चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनवर ५-४ ने मात करत आशिया चषकावर नाव कोरले. या विजयासह भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
जपानमधील काकामिगाहारा येथे रविवारी महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला. नवजोत कौरने पहिल्या हाफमध्ये गोल मारत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या हाफमध्ये चीनच्या तिआन लुओने गोल मारत संघाला बरोबरी मिळवून दिली. त्यामुळे शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला.
शूटआऊटमध्ये दोन्ही संघांचा स्कोअर ४-४ असा होता. त्यामुळे पाचवा प्रयत्न दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. प्रेक्षकांसाठीही हा क्षण रोमहर्षक होता. भारतातर्फे राणीने पाचव्या प्रयत्नात गोल करण्यात यश मिळवले. तर चीनची खेळाडू गोल करण्यात अपयश ठरली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
भारताच्या महिला संघाने यापूर्वी २००४ मध्ये आशिया चषक ही स्पर्धा जिंकली होती. अंतिम लढतीत भारताने जपानवर १- ० अशी मात केली होती. तर २००९ साली थायलंडमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत चीनने भारतावर ५ – ३ असा विजय मिळवला होता. या पराभवाचा वचपाही भारतीय संघाने रविवारी काढला.