पुण्यातील महिला खेळाडूचा शिक्षणातही ठसा

एके काळी अभ्यास जमत नसलेली अनेक रांगडी मंडळी कबड्डीकडे वळायची. पण आता काळ बदलला आहे. गेल्या काही वर्षांत शिकल्या-सवरलेल्या कबड्डीपटूंची संख्या कमालीची वाढली आहे. यात ठळकपणे नाव घ्यावे लागेल ते पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किशोरी शिंदेचे. महिलांच्या प्रो कबड्डी लीगमध्ये फायर बर्ड्स संघाच्या बचाव फळीची जबाबदारी हिमतीने सांभाळणाऱ्या किशोरीने मानव संसाधन (एचआर) विषयातून प्रथम श्रेणीत एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

२०१४च्या आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किशोरीने खेळ आणि अभ्यासाचा आपल्या आयुष्यात उत्तम समन्वय साधला आहे. दहावीला ७४ टक्के, बारावीला ६८ टक्के, बीकॉमला प्रथम श्रेणी असे आतापर्यंतचे सर्व शिक्षण तिने दर्जात्मकरीत्या साध्य केले आहे. मात्र शिक्षणाची तिची गोडी अद्याप टिकून आहे. यापुढे क्रीडा मानसशास्त्राचा अभ्यास करणार असल्याचे मनोगत व्यक्त करताना ती म्हणाली, ‘‘काही खेळाडूंमध्ये उत्तम खेळ असतो. परंतु स्पध्रेचे किंवा वातावरणाचे दडपण घेतल्यामुळे त्यांचा सराव आणि प्रत्यक्ष सामन्यामधील खेळ भिन्न प्रकारे दिसून येतो. यात कोणती बाजू खेळावर परिणाम करते आणि कामगिरी खालावते, याचा अभ्यास मला करायचा आहे.’’

किशोरीच्या घरात तसे शिक्षण आणि खेळासाठी अनुकूल वातावरण आहे. तिच्या वडिलांचे पदवी शिक्षण झाले आहे, तर आई दहावी उत्तीर्ण आहे, मोठी बहीण बीपीएड अभ्यासक्रम करून आता शिक्षिका आहे, छोटी बहीण अभियांत्रिकी पदवीधर आहे, तर भाऊ महाविद्यालयात शिक्षण घेतानाच कुस्तीचेही धडे गिरवतो आहे. याविषयी ती म्हणाली, ‘‘आमच्या कुटुंबात माझ्यावर कधीच अपेक्षांचे ओझे लादले गेले नाही. पण आई-बाबांचे स्वप्न पूर्ण केले आहे. खेळात आणि अभ्यासात दोन्हीमध्ये ठसा उमटवल्यामुळे त्यांना माझा सार्थ अभिमान वाटतो.’’

शिक्षणाची वाट निवडताना कोणते ध्येय तू समोर ठेवले होते, याचे उत्तर देताना किशोरी म्हणाली, ‘‘खेळापेक्षा मला शिक्षणाची अधिक आवड होती. दहावी झाल्यानंतर मला विज्ञान शाखेत रस होता. परंतु मी शिक्षणासोबत कबड्डीसुद्धा खेळावे. पदवी घेतल्यानंतर ठरवता येईल की तिला करिअरची वाट कोणती निवडता येईल, असा सल्ला माझे प्रशिक्षक राजेश ढमढेरे यांनी वडिलांना दिला. वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेतानाच यातील सर्वोत्तम गोष्ट आपण शिकायची, या ध्येयाने मी प्रेरित झाली होती. २००६ला रेल्वेत नोकरी लागली. मग पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर २०१०मध्ये एमबीए शिक्षणाचा निर्णय मी घेतला.’’

आतापर्यंत नऊ राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किशोरीपुढे २०१०च्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी होती. मात्र गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे ती हुकली. या दुखापतीनंतर विश्रांतीच्या काळात तिने एमबीएची वाट निवडली. खेळाडूला उत्तम शिक्षणसुद्धा घेणे किती हितकारक असते, याचे उत्तर देताना ती म्हणाली, ‘‘दुखापतीमुळे खेळाडूची कारकीर्द संपुष्टात येते. परंतु अशी वेळ आलीच तर आपल्याकडे असलेले शिक्षणच आयुष्य तारणारा पर्याय ठरू शकते. त्यामुळे खेळाबरोबरच चांगले शिक्षणही घ्या, असा सल्ला मी सर्व उदयोन्मुख खेळाडूंना देते.’’

‘‘राजमाता जिजाऊ संघात ढमढेरे सरांनी उत्तम शिस्त सांभाळली आहे. ते स्वत: एकीकडे मैदानावर खेळाडूंकडून खेळ घोटवून घेतात, तर दुसरीकडे आमचीच एक खेळाडू गायत्री मुलींच्या अभ्यासाकडे लक्ष पुरवते,’’ असे किशोरीने सांगितले.