विश्वविजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन महिला कबड्डीपटूंची प्रतीक्षा अखेर आज, मंगळवारी संपणार आहे. होळी सणाचे औचित्य साधून या तीन रणरागिणींना शासनाकडून एक कोटी रुपयांचे इनाम देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दीपिका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे या तिघींसह प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पाटण्याला झालेल्या महिला विश्वचषक कबड्डी स्पध्रेत विजेतेपद जिंकणाऱ्या या तिघींना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे, तर प्रशिक्षक भेंडिगिरी यांना २५ लाख रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले होते. परंतु गेल्या वर्षभर हे बक्षीस लालफितीतच अडकून पडले होते. ‘लोकसत्ता’ने वर्षभर या घोषणेचा पाठपुरावा केला आणि अखेर शासनास
आश्वासनपूर्ती करावी लागली. याबद्दल विश्वविजेत्या मुलींसह प्रशिक्षक भेंडिगिरी यांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले. १ ते ४ मार्च २०१२ या कालावधीत पाटण्याला झालेल्या पहिल्यावहिल्या महिला विश्वचषक कबड्डी स्पध्रेत भारताने जगज्जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य
कबड्डी असोसिएशनचे तत्कालिन अध्यक्ष अजित पवार यांनी प्रयत्न करून महाराष्ट्राच्या या चार वीरांना भरघोस रोख रकमेचे पारितोषिक मिळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. दिपिका, सुवर्णा आणि अभिलाषा या तिघींना ३१ मार्चपर्यंत शासनाकडून एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, अशी घोषणा सध्या चालू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी १४ मार्चला विधान परिषदेत केली होती. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे राज्य सरकारने आपला शब्द पाळून या सुवर्णकन्यांना बक्षिस प्रदान करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

Story img Loader