पीटीआय, मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी) संघ रविवारी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात उतरेल, तेव्हा बंगळूरुची कर्णधार स्मृती मनधानासमोर आक्रमक सलामी फलंदाज शफाली वर्माचे आव्हान असेल.

बंगळूरुने चांगल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा समावेश आपल्या संघात केला आहे. ज्यामध्ये अ‍ॅलिस पेरी, हेदर नाइट आणि सोफी डिवाइनसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्याकडे मनधानाच्या रूपात चांगली कर्णधारही आहे. मनधाना (३.४० कोटी) लीगची सर्वात महागडी खेळाडू आहे. रिचा घोष असल्याने संघ भक्कम दिसत आहे. भारतीय खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ मजबूत वाटतो आहे.

लॅनिंगसह जेस जोनासेन, मारिजाझ कॅप आणि अ‍ॅलिस कॅप्से या चार विदेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूंचीही मजबूत फळी त्यांच्याकडे आहे. शफाली, जेमिमा रॉड्रिग्ज, शिखा पांडे, पूनम यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया, राधा यादव या सर्व भारताच्या अनुभवी खेळाडू आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघातील वेगवान गोलंदाज टिटास साधु, जम्मू आणि काश्मीरची जासिया अख्तर तसेच, यष्टीरक्षक अपर्णा मंडलचा संघात समावेश आहे.

‘‘माझी काही खेळाडूंशी चर्चा झाली असून त्यांची मजबूत बाजू जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. या खेळाडूंकडून मला काही शिकायला मिळेल आणि मी त्यांना माहितीही देईन,’’ असे दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने निवेदनात म्हटले. मनधानासाठी चार विदेशी खेळाडूंची निवड करणे सोपे आहे. ज्यामध्ये कॅप, नाइट, पेरी आणि वेगवान गोलंदाज मेगन शुट यांचा समावेश आहे. मात्र, चार भारतीय खेळाडूंचे स्थान निश्चित करण्यासाठी मनधानाचा कस लागेल. यामध्ये मनधाना, रिचा आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर यांचा समावेश आहे.

  • वेळ : सायं. ३.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१