मेलबर्न ; कॅटलिन उस्मेच्या निर्णायक गोलच्या जोरावर कोलंबियाने मंगळवारी जमैकाचा १-० असा पराभव करून महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत कोलंबियासमोर युरोपीय विजेत्या आणि जेतेपदासाठी प्रमुख दावेदार इंग्लंडचे आव्हान असेल.
कोलंबियाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत कोलंबियाने दक्षिण कोरिया आणि जर्मनी या संघांना नमवण्याची किमया साधली होती. दुसरीकडे जमैकाने फ्रान्स आणि ब्राझील यांसारखे संघ असलेल्या गटातून आगेकूच केली होती. त्यामुळे जमैकाला नमवण्यासाठी कोलंबियाला सर्वोत्तम खेळ करावा लागणार होता आणि त्यात ते यशस्वी ठरले.
या सामन्यात दोन्ही संघांनी ५०-५० टक्के वेळ चेंडू आपल्याकडे राखला. मात्र, याचा अधिक चांगला वापर कोलंबियाने केला. त्यांनी गोलच्या दिशेने ११ फटके मारले. युवा खेळाडू लिंडा कैसेडोला गोलच्या संधी मिळाल्या, पण तिला चेंडू गोलजाळय़ात मारण्यात अपयश आले. मात्र, ५२व्या मिनिटाला अॅना गुझमानच्या पासवर उस्मेने गोल नोंदवत कोलंबियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यंदाच्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला प्रथमच जमैकाविरुद्ध गोल करण्यात यश आले. यानंतर जमैकाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कोलंबियाचा भक्कम बचाव भेदता आला नाही. त्यामुळे जमैकाचा पराभव झाला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.
फ्रान्सची मोरोक्कोवर मात
फ्रान्सने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठला आहे. मंगळवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोवर ४-० अशी मात केली. विश्वचषकातील बाद फेरीत फ्रान्स महिला संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. फ्रान्सकडून ले सोमेरने (२३ व ७०व्या मिनिटाला) दोन, तर कादिदिआतू दियानी (१५व्या मि.) आणि केन्झा डाली (२०व्या मि.) यांनी एकेक गोल केला.