पीटीआय, नवी दिल्ली : महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला दोन महिनेच शिल्लक असताना भारताचा मुख्य प्रशिक्षक रमेश पोवारची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) बदली करण्यात आली आहे. पोवारऐवजी महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद कोण सांभाळणार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले नसले, तरी भारताचा माजी खेळाडू ऋषिकेश कानिटकरची फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.
कानिटकरने यापूर्वी भारताच्या १९ वर्षांखालील पुरुष आणि भारत-अ संघांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. आता ९ डिसेंबरपासून मायदेशात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून तो महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल. तसेच पोवार ‘एनसीए’मध्ये फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करेल. ‘‘वरिष्ठ महिला संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) व्हीव्हीएस लक्ष्मणच्या साथीने काम करेल. ‘बीसीसीआय’च्या पुर्नरचना प्रक्रियेचा भाग म्हणून पोवार आता पुरुष क्रिकेटचा भाग बनेल,’’ असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.
पोवारची मे २०२१मध्ये दुसऱ्यांदा भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक झाली होती. मात्र, त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताला फारसे यश मिळाले नाही. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, पण यावर्षीच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीचा टप्पाही गाठता आला नाही. तसेच परदेश दौऱ्यांतही भारतीय संघ यशस्वी कामगिरी करू शकला नाही.