वर्ष १९७२. ठिकाण- युएस ओपन या टेनिसविश्वातल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचं व्यासपीठ. महिला एकेरीत विजेत्या बिली जिन किंग यांना जेतेपदाचा करंडक देण्यात आला. सगळं काही परंपरेप्रमाणे सुरू होतं. पण यानंतर जिन किंग जे बोलल्या ते आयोजकांना चपराक लगावणारं होतं. जिन किंग म्हणाल्या, ‘पुढच्या वर्षी या स्पर्धेत खेळण्यावर मी बहिष्कार घालण्याचीच शक्यता आहे. बाकी महिला खेळाडूही तसंच करु शकतात. हे चाललंय ते बरोबर नाही. मी महिला खेळाडूंशी याबाबत बोलले नाहीये. पण यावर आमची चर्चा होते पण पुढे काहीच होत नाही. त्यांचा निर्णय त्या घेतील पण मी पुढच्या वर्षी या स्पर्धेत खेळेन असं वाटत नाही’. जिन किंग यांच्या उद्गारांनी गहजब झाला. विजेत्या खेळाडूच्या परखड भाषणामुळे युएस ओपन संयोजक खजील झाले. कारण होतं पुरुष आणि महिला विजेत्या खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनातली तफावत.

१९७२ मध्ये युएस ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीचा विजेता इली नटसे यांना २५००० अमेरिकन डॉलर्स रकमेने गौरवण्यात आले. जिन किंग महिला एकेरीच्या विजेत्या होत्या. त्यांनाही नटसे यांच्याएवढीच रक्कम मिळणं अपेक्षित होतं. पण तत्कालीन रचनेनुसार जिन किंग यांना १०००० अमेरिकन डॉलर्स रकमेने सन्मानित करण्यात आलं. एकाच स्पर्धेत विजेत्यांच्या मानधनात १५००० अमेरिकन डॉलर्स इतक्या प्रचंड रकमेचा फरक होता. महिला खेळाडूंमध्ये याबाबत चर्चा व्हायची, हे सांगायला हवं, मांडायला हवं असा सूर असायचा. पण हे संयोजकांना सांगण्याचं धारिष्ट्य जिन किंग यांनी केलं. टेनिसविश्वात चार ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे चार शिखरं. चार सर्वोत्तम स्पर्धा. अमेरिकेच्या जिन किंग यांनी घरच्या मैदानावर संयोजकांना भेदभाव दाखवून दिला. जिन किंग यांच्या शब्दाला वजन होतं कारण त्यांच्या नावावर तोपर्यंत सहा ग्रँड स्लॅम जेतेपदं होती. संयोजकांमध्ये तीन ग्रँडस्लॅम विजेते जॅक क्रीमर यांचंही नाव होतं पण त्यांनी समान मानधनाला नकार दिला. जिन किंग यांच्यासह काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आणि सूत्रं हलली. १९७३ मध्ये युएस ओपन संयोजकांनी पुरुष आणि महिला विजेत्यांना समान मानधन द्यायला सुरुवात केली. आपल्या न्याय हक्कांसाठी बोलण्याचं धाडस जिन यांनी दाखवलं. युएस ओपन संयोजकांनीही पोकळ आश्वासनं न देता वर्षभरात महत्त्वपूर्ण असा बदल केला. यंदा या बदलाला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. स्त्रीवाद, वर्किग वुमन असे शब्द रुढ होण्याच्या अनेक वर्ष आधीच जिन किंग आणि युएस ओपन यांनी सकारात्मक पायंडा पाडला.

Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत

महिलांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेणाऱ्या जिन किंग यांनी वर्षभरात आणखी एक मैलाचा दगड गाठला. सर्वसाधारपणे महिला आणि पुरुष यांचे सामने आपापल्या गटात होतात पण १९७३ मध्ये बॅटल ऑफ सेक्सेस या प्रदर्शनीय सामन्यात २९ वर्षीय जिन किंग आणि ५५ वर्षीय बॉबी रिग्स आमनेसामने उभे ठाकले. या सामन्यापूर्वी रिग्स आणि मार्गारेट कोर्ट यांच्यातही सामना झाला होता. रिग्स यांनी त्या सामन्यात कोर्ट यांचा धुव्वा उडवला. त्या सामन्याचा निकाल रिग्स यांच्या बाजूने होता. पण बिली जिन यांनी हार मानली नाही.

हौस्टन अॅस्ट्रोडोम इथे झालेला हा मुकाबला अमेरिकेत तसंच जगभरात काही दशलक्ष लोकांनी टीव्हीवर पाहिला. तोपर्यंत टेनिस ही पुरुषांची मक्तेदारी समजली जायची. पण जिन किंग यांनी हा मुकाबला जिंकत सर्व प्रथापरंपरांना छेद दिला. या सामन्यानंतर महिला टेनिसविषयीचं गांभीर्य वाढलं. या सामन्यानंतर जिन जे बोलल्या ते महत्त्वाचं होतं. त्या म्हणाल्या, मी हरले तर महिला टेनिस ५० वर्ष मागे गेलं असतं. याने महिला टेनिसच्या प्रतिमेला धक्का बसला असता. जगभरातल्या महिलांच्या आत्मविश्वासावरही परिणाम झाला असता. ५५वर्षांच्या खेळाडूला हरवण्यात थ्रिल नव्हतं. मी जिंकल्याने तरुण मुली टेनिसकडे वळण्याचा विचार करतील, ते महत्त्वाचं आहे.

दोन दशकांहून अधिक काळ कारकीर्द विस्तारलेल्या बिली जिन किंग यांच्या खेळात आणि जिंकण्यात अद्भुत सातत्य होतं. घरातून खेळांचे बाळकडू मिळालेल्या जिन किंग यांनी सॉफ्टबॉलऐवजी टेनिसवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि टेनिसविश्वाला एक नायिका मिळाली. त्याकाळी सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बिली जिन किंग यांचं नाव अग्रणी होतं. खेळाडूंना प्रायोजक मिळवून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

जिन किंग खेळणं आणि जिंकणं यापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. एकेरीत १२ तर दुहेरीत २७ अशी एकूण ३९ ग्रँडस्लॅम जेतेपदं नावावर असणाऱ्या जिन यांनी महिला टेनिसपटूंसाठी डब्ल्यूटीए अर्थात ‘वूमन्स टेनिस असोसिएशन’ची स्थापना केली. आजही ही संघटना महिला टेनिसपटूंचे अधिकार आणि हक्क यांच्यासाठी काम करते. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केलेल्या जिन यांनी फेडरेशन चषक आणि विटमन चषकात अमेरिकेच्या संघाचं नेतृत्व केलं. देदिप्यमान अशा कारकीर्दीसाठी जिन यांना ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट करण्यात आलं.

टेनिस खेळाला योगदान तसंच महिला टेनिसपटूंच्या हक्कांसाठी निर्भीडपणे लढणाऱ्या बिली जिन किंग यांच्या सन्मानार्थ अमेरिकेतल्या फेड चषकाला त्यांचं नाव देण्यात आलं. आता ही स्पर्धा ‘बिली जीन किंग चषक’ नावाने ओळखली जाते. जगातल्या अव्वल अशा स्पर्धेला महिलेचं नाव मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे असं आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने म्हटलं होतं.

‘स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या त्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या. बिली जिन किंग यांनी वूमन्स स्पोर्ट्स मॅगझिनही सुरू केलं. टाईम मॅगझिननेही त्यांना गौरवलं. युएस ओपन ज्या ठिकाणी होते त्या वास्तूचं ‘बिली जिन किंग नॅशनल टेनिस सेंटर’ असं नामकरण करण्यात आलं. अमेरिकेतला सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

२०१७मध्ये नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीत बिली जिन किंग यांनी केलेलं भाषण व्हायरल झालं होतं. मोठ्या समुदायाला संबोधित करताना त्या म्हणाल्या, ‘संघर्ष ही अविरत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. शिकणं थांबू नका. कसं शिकायचं हा विचार बंद होऊ देऊ नका. अडथळे-समस्या येतीलच, त्यांचा सामना करत वाटचाल करा. तुम्ही नेहमी सतर्क राहायला हवं. तुमच्या शरीराचं ऐका. आरोग्य असेल तरच नवनवी शिखरं गाठता येतील’.

ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी सर्वाधिक प्रसिद्धी आणि ग्लॅमर लाभलेल्या विम्बल्डन स्पर्धेत पुरुष आणि महिला विजेत्यांना समान मानधन मिळायला २००७ वर्ष उजाडलं. तेही व्हीनस विल्यम्स या आघाडीच्या महिला टेनिसपटूने यासंदर्भात सातत्याने आवाज उठवला म्हणून. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत हा बदल २००१ मध्ये झाला तर फ्रेंच ओपन स्पर्धेत या बदलासाठी २००६ वर्ष उजाडलं. युएस ओपन संयोजकांनी अनेक दशकं आधीच पुढारलेला विचार करत बदल घडवून आणला. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये मानधनात लिंगभाव समानता आली असली तरी अन्य स्पर्धांमध्ये परिस्थिती फारशी सुधारलेली नाही.

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेत पुरुष विजेत्याला ८.५ मिलिअन डॉलर्स बक्षीस रकमेने गौरवण्यात आलं. महिला विजेतीला मात्र ३.९ मिलिअन डॉलर्स बक्षीस रकमेने सन्मानित करण्यात आलं. इटालियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा नसली तरी जगातल्या आघाडीच्या स्पर्धांमध्ये नाव घेतलं जातं. मात्र असं असूनही पुरुष-महिला विजेत्यांच्या मानधनात एवढी प्रचंड तफावत होती.

जेंडर पे गॅप हा मुद्दा आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय पातळीवर सातत्याने ऐरणीवर येतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी यासंदर्भात ठराविक वर्षांनी अहवाल तयार करतं. २०२२ अहवालात संघटनेने असं म्हटलं की स्त्री-पुरुष वेतन/मानधन समानता येण्यासाठी १३२ वर्ष लागतील. १४६ देशांमध्ये पाहणी अभ्यास करुन हा अहवाल तयार करण्यात आला. दक्षिण आशियात स्त्री-पुरुष वेतनातली तफावत आजही सर्वाधिक आहे.

गेल्यावर्षी बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) महिला क्रिकेटपटूंना टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी२० खेळण्यासाठी पुरुष खेळाडूंप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेतला. आता भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना कसोटीसाठी १५ लाख, वनडेसाठी ६ लाख तर ट्वेन्टी२० साठी ३ लाख असं समान मानधन मिळतं आहे.

देशातल्या अव्वल अभिनेत्रींनी वेतन मानधनातल्या तफावतीसंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. अभिनेत्री मुख्य भूमिकेत असली तरी तिला मिळणारं मानधन हे अभिनेता मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकाराला मिळणाऱ्या मानधनापेक्षा बरंच कमी आहे.

मुलगी शिकली, प्रगती झाली हे धोरण आपल्या कानी पडतं. चूल आणि मूल यापुरतं मर्यादित न राहता घराबाहेर पडून असंख्य महिला काम करू लागल्या आहेत. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वर्किंग वूमनची संख्या वाढू लागली. महिला, मुली खेळांची मैदानं गाजवत आहेत. पण आजही महिलांना पुरुष सहकाऱ्यांएवढं मानधन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. ५० वर्षांपूर्वी बिली जिनी किंग यांनी अमेरिकेत प्रवाहाविरुद्ध जात भूमिका घेतली आणि बदल घडवून आणला. ७९वर्षीय बिली जिन किंग यांच्या उपस्थितीत यंदा युएस ओपनमध्ये या बदलाची पन्नाशी साजरी केली जाणार आहे. खेळ, स्त्रीशक्ती आणि सामाजिक बदल यांचा सुरेख मिलाफ आठवणीत राहण्यासारखा आहे.

Story img Loader