Sachin Tendulkar Facilitate Indian Women U-19 WC Team: जगातील क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकाऱ्यांनी अहमदाबादमध्ये रविवारी पहिल्या ICC अंडर-१९ महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला ५ कोटी रुपयांचा चेक प्रदान करत त्यांचा गुणगौरव करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील टी२० विश्वचषक विजयी संघाला यावेळी मास्टर-ब्लास्टरने प्रेरणादायी असे भाषण दिले. पॉचेफस्ट्रूममध्ये शफाली वर्माच्या संघाने विजेतेपदाच्या सामन्यात इंग्लंडला अवघ्या ६८ धावांत गुंडाळले आणि त्यानंतर लक्ष्याचा सहज पाठलाग करत विश्वचषकावर नाव कोरले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड च्या तिसऱ्या टी२० सामन्याआधी हा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोबत बीसीसीआयचे सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार आणि आयपीएल गव्हर्निग राजीव शुक्ला उपस्थित होते. सचिनने आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ‘केम छो अहमदाबाद, मजामा’ असे म्हणत सर्वांचे स्वागत केले.
अंडर-१९ महिला संघाचे कौतुक करताना सचिन म्हणाला, “ वयाच्या १०व्या वर्षी १९८३ साली कपिल देव यांना विश्वचषक जिंकताना मी हे स्वप्न पहिले होते. जे २०११ साली पूर्ण होताना पहिले आज १२ वर्षानंतर तुमच्या रुपात मी ते पुन्हा जगलो. विश्वचषक जिंकलेल्या संपूर्ण संघाचे हार्दिक अभिनंदन. पुढील अनेक वर्षे तुम्ही नवीन येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहात. प्रत्येक वेळी नव्याने आलेल्या फळाफुलांचे कौतुक होते मात्र ज्यांनी झाडांची मुळे रोवली त्यांना लक्षात ठेवलेच पाहिजे. मागच्या पिढीतील शांतारंगा स्वामी, डायना एन्डूलजी, अंजुम चोप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी सारख्या अनेक महिला क्रिकेटपटूमुळे आज महिला क्रिकेटला नाव आणि चेहरा मिळाला आहे आणि तो तुम्ही पुढे घेऊन जा.”
समान संधी बाबत बोलताना सचिन तेंडूलकर म्हणतो, “ मी महिला आणि पुरुष दोन्ही प्रकारच्या क्रिकेटपटूना समान संधी मिळण्याबाबत आग्रही असतो. त्यामुळे पुरुषांबरोबरच तुम्ही जिंकलेल्या विश्वचषकाचे देखील तितकेच कौतुक होत आहे. बीसीसीआय आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांनी कायम प्रोत्साहन दिले होते आणि यापुढे देखील देत राहतील. अशीच कामगिरी करत रहा. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!” या सोहळ्यानंतर अंडर-१९ विश्वचषकाचा विजयी महिला संघ व इतर मान्यवर तिसऱ्या टी२० चा आनंद घेण्यासाठी स्टेडीयममध्ये बसलेले आहेत.