Women World Boxing Championshipsनवी दिल्ली : गतविजेत्या निकहत झरीनसह नितू घंघास आणि मनीषा मॉन यांनी मंगळवारी सफाईदार विजयांसह महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.इंदिरा गांधी संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील ५० किलो वजनी गटात निकहतने मेक्सिकोच्या फातिमा हरेराला ५-० असे सहज नमवले. आक्रमक सुरुवात करणाऱ्या निकहतच्या खेळात वेगवान हालचालींचाही मोठा वाटा होता. हरेराने एका क्षणी प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण निकहतचे आक्रमण निर्णायक ठरले. निकहतची गाठ आता थायलंडच्या चुथामत रक्षतशी पडेल.
‘‘गतवर्षीही जागतिक स्पर्धेत मी फातिमाविरुद्ध विजय मिळवला होता. परंतु या वेळी फातिमा अधिक तयारीनिशी खेळल्याचे जाणवले. माझ्या खेळातील वेग वाढला असला, तरी अजूनही प्रगतीला वाव आहे,’’ असे निकहत म्हणाली.नितूने ४८ किलो वजन गटात ताजिकिस्तानच्या सुमया क्वोसिमोवाचे आव्हान निर्विवाद वर्चस्व राखून संपुष्टात आणले. नीतूच्या सुरुवातीच्या आक्रमणापासून सुमया दडपणाखाली गेली आणि अखेर तिला उभे देखील राहता येत नव्हते. पंचांनी लढत थांबवून नीतूला विजयी घोषित केले.
५७ किलो वजनी गटात मनीषा आणि तुर्कीची नूर तुऱ्हान यांच्यात कमालीचा वेगवान खेळ पहायला मिळाला. दोघी आक्रमक खेळत होत्या. परंतु मनीषाने लढतीवर वेळीच नियंत्रण मिळवताना बचावावर भर देत नूरला निष्प्रभ केले. मनीषाची गाठ आता फ्रान्सच्या अमिना झिदानीशी, तर नीतूची गाठ जपानच्या माडोका वाडाशी पडणार आहे. दरम्यान,६३ किलो वजन गटातून शशी चोप्राचे आव्हान संपुष्टात आले. जपानच्या मई किटोने शशीविरुद्ध पंचांकडून ४-० असा कौल मिळवला.