भारतानं बांगलादेशवर ११० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी २३० धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांगलादेशला सर्वबाद ११९ धावाच करता आल्या. या विजयासह भारत गुणतातालिकेत तीन विजयांसह ६ गुण मिळत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. भारताचा रनरेट +०.७६८ इतका आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना २७ मार्चला दक्षिण अफ्रिकेसोबत असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशचा डाव
भारताच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशचा एकही फलंदाज तग धरु शकला नाही. एका मागे एक असे करत सर्वच खेळाडू तंबूत परतले. शरमीन अक्तर (५), मुर्शिदा खातुन (१९), फरगाना होक (०), निगर सुलताना (३), रुमाना अहमद (२), रितु मोनी (१६), लता मोंडल (२४), सलमा खातुन (३२), नहिदा अक्तर(०), फहिमा खातुन (०) अशा धावा करून फलंदाज बाद झाले. जहानारा आलम (११*) या धावसंख्येवर नाबाद राहिली. भारताकडून स्नेह राणाने १० षटकात ३० धावा देऊन ४ गडी बाद केले. यात दोन षटकं निर्धाव होती. तर झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

भारताचा डाव
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. करो या मरोच्या सामन्यात स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली. मात्र ३० या वैयक्तिक धावसंख्येवर असताना स्मृती मंधाना नहिदा अक्तरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. त्यानंतर ४२ धावा करून शेफाली वर्षी यष्टीचीत झाली आणि तंबूत परतली. त्यानंतर आलेल्या यस्तिका भाटीयाला हवी तशी साथ मिळाली नाही. मात्र एका बाजूला तिथे संघाचा डाव सावरून धरला. मिताली राज (०), हरमनप्रीत कौर (१४), रिचा घोष (२६) धावा करून बाद झाले. यस्तिका भाटियाने ८० चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. मात्र अर्धशतक झलकवल्यानंतर रितू मोनीच्या गोलंदाजीवर नहिदा अक्तरने तिचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.

भारतीय संघाची कामगिरी

भारत विरुद्ध पाकिस्तानभारत २४४/७, पाकिस्तान १३७भारताचा १०७ धावांनी विजय
भारत विरुद्ध न्यूझीलंडन्यूझीलंड २६०/९, भारत १९८भारताचा ६२ धावांनी पराभव
भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारत ३१७/८, वेस्ट इंडिज १६२भारताचा १५५ धावांनी विजय
भारत विरुद्ध इंग्लंडभारत १३४, इंग्लंड १३६/६भारताचा ४ गडी राखून पराभव
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत २७७/७, ऑस्ट्रेलिया २८०/४भारताचा ६ गडी आणि ३ चेंडू राखून पराभव

भारतीय संघ: स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, रिचा घोष, पूजा वस्त्राकार, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड

बांगलादेश संघ: शरमीन अक्तर, मुर्शिदा खातुन, फरगाना होक, निगर सुलताना (कर्णधार), रुमाना अहमद, रितु मोनी, लता मोंडल, सलमा खातुन, नहिदा अक्तर, फहिमा खातुन, जहानारा आलम

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women world cup 2022 india vs bangladesh match updates rmt