ब्रिस्बेन : अनुभवी युजिनी ले सोमर व वेंडी रेनार्ड यांच्या गोलच्या जोरावर फ्रान्सने शनिवारी महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ‘फ’ गटाच्या सामन्यात ब्राझीलवर २-१ असा विजय मिळवला. या विजयामुळे फ्रान्सने गटात अग्रस्थान मिळवले असून पुढच्या फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा कायम आहेत. फ्रान्सला पहिल्या सामन्यात जमैकाविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
फ्रान्सने सामन्याला आक्रमक सुरुवात केली. १३व्या मिनिटाला ले सोमरला हेडरच्या साहाय्याने गोल करण्याची संधी होती, पण तिने संधी गमावली. मात्र, १७व्या मिनिटाला ले सोमरनेच ब्राझीलच्या बचावफळीला चकवत गोल केला व फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तिचा हा ९०वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. यानंतर ब्राझीलकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण त्यांना यश मिळाले नाही व मध्यंतरापर्यंत फ्रान्सकडे आघाडी कायम राहिली. सामन्याच्या ५८व्या मिनिटाला ब्राझीलच्या डेबोरा ख्रिस्तिआन डी ऑलिवेएराने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. परंतु ही बरोबरी फार काळ टिकली नाही. आघाडीपटू वेंडी रेनार्डने ८३व्या मिनिटाला गोल झळकावत फ्रान्सला २-१ असे पुन्हा आघाडीवर नेले. यानंतर फ्रान्सच्या बचाव फळीने ब्राझीलला पुनरागमनाची संधी न देता विजय निश्चित केला.
फ्रान्स गटात अव्वल
साखळी फेरीतील एक सामना शिल्लक असताना फ्रान्स ‘फ’ गटात चार गुणांसह अग्रस्थानी आहे. या गटातील अन्य लढतीत जमैकाने पनामाला १-० असे नमवले. त्यामुळे जमैकाचा संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर ब्राझीलची तीन गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. गटातील अंतिम सामन्यांत फ्रान्सपुढे पनामा, तर ब्राझीलपुढे जमैकाचे आव्हान असेल. आगेकूच करण्यासाठी ब्राझीलला विजय महत्त्वाचा असेल.
स्वीडनची इटलीवर मात
स्वीडनने शनिवारी झालेल्या सामन्यात इटलीवर ५-० असा मोठय़ा फरकाने विजय मिळवला. स्वीडनसाठी अमांडा इलेस्टेडने (३९व्या व ५०व्या मिनिटाला) दोन गोल केले. पूर्वार्धात फ्रिडोलिना रोल्फो, स्टिना ब्लॅकस्टेनियस यांनी आणि तर उत्तरार्धात रेबेका ब्लोमक्विस्टने गोल करत स्वीडनच्या विजयात योगदान दिले.