न्यूझीलंडमध्ये ४ मार्चपासून महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या १२व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात यजमानांना वेस्ट इंडिजकडून ३ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. या विश्वचषकाच्या दावेदार संघांमध्ये न्यूझीलंडच्या नावाचा समावेश आहे. मात्र पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने चुरस वाढली आहे. भारताचा पहिला सामना ६ मार्च रोजी रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याची कायमच क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता असते. मग तो क्रिकेट सामना असो की हॉकी सामना, महिलांचा सामना असो की पुरुषांचा सामना तेवढीच उत्सुकता असते. हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, शेजारच्या देशावर भारतीय महिला संघाचे पारडे जड आहे. विश्व चषकात टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध अजिंक्य राहिली आहे. पुरुष संघही २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी अजिंक्यच होता.
याआधी विश्वचषकात दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही वेळा भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर एकूण एकदिवसीय विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास भारतावे पाकिस्तानला कायमच नमवले आहे . म्हणजेच भारतीय संघाने सर्व १० एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. २०१७ आणि २००९ च्या विश्वचषकातील दोन्ही सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध १०० धावांचा टप्पाही गाठलेला नाही. २०१७ च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा ९५ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात एकता बिश्तने १८ धावांत सर्वाधिक पाच बळी घेतले. यापूर्वी २००९ च्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून शानदार विजय नोंदवला होता.
वर्ल्ड कपमधील भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक
- भारत विरुद्ध पाकिस्तान – ६ मार्च, सकाळी ०६.३० वा.
- न्यूझीलंड विरुद्ध भारत – १० मार्च, सकाळी ०६.३० वा.
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – १२ मार्च, सकाळी ०६.३० वा.
- भारत विरुद्ध इंग्लंड – १६ मार्च, सकाळी ०६.३० वा.
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १९ मार्च, सकाळी ०६.३० वा.
- भारत विरुद्ध बांगलादेश – २२ मार्च, सकाळी ०६.३० वा.
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २७ मार्च, सकाळी ०६.३० वा.