आशिया चषकात चीनवर पेनल्टी शुटआऊटवर  ५-४ अशी मात करत, भारतीय महिला संघ हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. यावेळी संघाच्या गुणवत्तेवर विश्वचषकासाठी पात्र होणं गरजेचं होतं, आणि तसं करण्यात माझा संघ यशस्वी ठरला याचा मला आनंद असल्याचं भारताची कर्णधार राणी रामपाल हिने म्हणलं आहे. या स्पर्धेसाठी आम्ही खूप मेहनत घेतली होती, त्या मेहनतीचं फळ आम्हाला विजयाच्या स्वरुपात मिळाल्याने आम्ही आनंदात आहोत, असंही राणी म्हणाली.

अवश्य वाचा –  चक दे ! चीनला नमवत आशिया चषक स्पर्धेत भारताची बाजी

तब्बल १३ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय महिलांचा संघ आशिया चषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटवर घेण्यात आला. यावेळी भारताची गोलकिपर सविताने चीनच्या खेळाडूचा शेवटचा गोल करण्याचा प्रयत्न उधळवून लावला आणि भारताच्या विजयावर ५-४ असं शिक्कामोर्तब  केलं. आमच्या संघात अनेक तरुण खेळाडुंचा भरणा होता. या संघाने आशिया चषकासारख्या स्पर्धेत चांगला खेळ करुन विजेतेपद पटकावणं ही माझ्यासाठी महत्वाची गोष्ट असल्याचं राणी रामपालने नमूद केलं.

इतक्या महत्वाच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपल्यावरचा ताबा सोडला नाही. सविताने शेवटच्या क्षणी अडवलेला गोल हा या स्पर्धेतला माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण होता. २०१८ साली होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांआधी हा विजय भारतीय संघाला प्रेरणा देणारा ठरेल, असं मत राणीने व्यक्त केलंय. २०१० साली भारतीय महिलांचा संघ विश्वचषकासाठी शेवटचा पात्र ठरला होता. २०१४ साली झालेल्या स्पर्धेत भारतीय महिलांना या स्पर्धेसाठी स्वतःला पात्र ठरवता आलं नव्हतं. त्या तुलनेत यंदा भारतीय महिला हॉकी संघाने केलेली कामगिरी ही नक्कीच वाखणण्याजोगी मानली जात आहे.

एखाद्या मोठ्या स्पर्धेतला विजय हा तुमच्या संघाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पुरेसा असतो. जोहान्सबर्ग येथे झालेल्या वर्ल्ड हॉकीलीग सेमीफायनल स्पर्धेत आम्ही आमच्या संघाच्या कामगिरीवर खूश नव्हतो. यानंतर आम्ही प्रत्येक स्पर्धा जिंकायची याच उद्देशाने खेळण्याचं ठरवलं. आम्ही सराव शिबीरात पेनल्टी कॉर्नवर मेहनत घेतली. गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करण्याच्या अनेक युक्त्या शोधून काढल्या. या सगळ्या मेहनतीचा आम्हाला फायदा झाल्याचंही राणी म्हणाली.

Story img Loader