मलेशियात सुरु असलेल्या महिलांच्या आशिया चषकात आज बांगलादेशच्या महिला संघाने इतिहासाची नोंद केली. सहा वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघावर बांगलादेशने मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशने याच स्पर्धेत भारताला साखळी फेरीतही पराभवाचा धक्का दिला होता. भारतीय महिलांचं गचाळ क्षेत्ररक्षण आजच्या सामन्यात बांगलादेशच्या पथ्यावर पडलं. बांगलादेशकडून रुमाना अहमदने अष्टपैलू खेळ करत सामनावीराचा किताब पटकावला.

बांगलादेशने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मात्र भारताच्या पहिल्या फळीतल्या फलंदाज संघाला मजबूत सुरुवात करुन देऊ शकल्या नाहीत. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्यामुळे भारतीय डावात मोठी भागीदारी रचलेली पहायला मिळाली नाही. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरने एका बाजूने किल्ला लढवत ठेवत आपलं अर्धशतक साजरं केलं. हरमनप्रीतच्या खेळीत ७ चौकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावरच भारताने २० षटकांमध्ये ११२ धावांचा पल्ला गाठला.

भारताने दिलेल्या ११३ धावांचा पाठलाग करताना, बांगलादेशी महिलांनीही ठराविक अंतराने विकेट फेकायला सुरुवात केली. मात्र यादरम्यान झालेल्या छोटेखानी भागीदाऱ्यांमुळे बांगलादेशच्या संघाने सामन्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. अखेर भारताने दिलेलं आव्हान ३ गडी राखून पूर्ण करत बांगलादेशने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

संक्षिप्त धावफलक – भारत २० षटकांत ११२/९, हरमनप्रीत कौर ५६, रुमाना अहमद २/२२ विरुद्ध बांगलादेश निगारा सुलताना २७, रुमाना अहमद २३, पूनम यादव ४/९ निकाल – बांगलादेश सामन्यात ३ गडी राखून विजयी

Story img Loader