भारतीय महिला हॉकी संघाची गोलकिपर सविता पुनियाने केलेल्या अभेद्य बचावामुळे महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने चीनवर मात केली. पेनल्टी कॉर्नवर भारतीय महिलांनी चीनची झुंज ५-४ अशी मोडून काढत तब्बल १३ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारताला आशिया चषकाचं विजेतेपद मिळवून दिलं. निर्धारित आणि अतिरिक्त वेळेत १-१ अशी बरोबरी झाल्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शुटआऊटवर गेला.

अवश्य वाचा – गुणवत्तेवर विश्वचषकासाठी पात्र ठरलो याचा आनंद – राणी रामपाल

भारताकडून कर्णधार राणी रामपालने अखेरचा गोल झळकावत शुटआऊटमध्ये आघाडी घेतली. यानंतर चीनचा शेवटचा गोल अडवणं भारताला गरजेचं होतं. यावेळी भारताची गोलकिपर सविता पुनियाने आपला संयम न ढळू देता चीनच्या खेळाडूचा गोल करण्याचा प्रयत्न फोल ठरवला. या प्रसंगामुळे अनेकांना ‘चक दे इंडिया’ सिनेमातल्या शेवटच्या प्रसंगाची आठवण झाली. या स्पर्धेत भारताने एकही सामना न गमावता स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

२०१० साली भारतीय महिलांचा संघ शेवटचा हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. मात्र, या स्पर्धेत भारताला ९ व्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर २०१४ साली झालेल्या स्पर्धेत भारतीय महिलांचा संघ स्पर्धेत पात्र ठरला नव्हता. त्यामुळे आशिया चषकातला विजय भारतीय संघासाठी पुढच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी फायदेशीर ठरेल, असा आत्मविश्वास भारतीय संघाची कर्णधार राणी रामपालने व्यक्त केला आहे.

अवश्य वाचा – चक दे ! चीनला नमवत आशिया चषक स्पर्धेत भारताची बाजी

Story img Loader