सिल्हेट (बांगलादेश)

श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत आपल्या मोहिमेची सकारात्मक सुरुवात करणाऱ्या भारतीय महिला संघाचा सोमवारी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मलेशियाशी सामना होणार आहे. या सामन्यात मोठा विजय साकारण्याचा भारताचा मानस असेल, त्यासोबतच सलामीवीर शफाली वर्माच्या कामगिरीवरही सर्वाचे लक्ष असेल.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्याकडे एखाद्या सराव सामन्यासारखे पाहू शकेल. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात मलेशियाचा नऊ गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघही या सामन्यात मोठा विजय मिळवणे अपेक्षित आहे. जेमिमा रॉड्रिग्जच्या खेळीमुळे भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला नमवले होते. भारताच्या नजरा पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाकडे असून अधिकाधिक खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

भारताची सलामीवीर शफालीला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागले आहे. १८ वर्षीय शफालीने गेल्या वर्षी मार्चपासून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावलेले नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान तिने काही चांगल्या खेळी केल्या. मात्र, त्यानंतरच्या इंग्लंड दौऱ्यात तिला चमक दाखवता आली नाही. शफालीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन वर्षे झाली असून तिला खेळात सातत्य राखता आलेले नाही. मलेशियाच्या कमी अनुभवी गोलंदाजांविरुद्ध धावा करून आत्मविश्वास परत मिळवण्याचा शफालीचा प्रयत्न असेल.

रॉड्रिग्जने गेल्या सामन्यात आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. हरमनप्रीतलाही लय सापडली आहे, तर गेल्या सामन्यात अपयशी झालेली सलामीवीर स्मृती मानधना मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात किरण नवगिरेसारख्या नवख्या खेळाडूंनाही संधी मिळू शकते. गोलंदाजीचे योग्य संयोजन तयार करण्याकडेही भारतीय संघाचे लक्ष असेल. गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने रेणुका सिंह ठाकूरवर असेल.

* वेळ : दुपारी १ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

Story img Loader