दक्षिण अफ्रिकेला हरवून इंग्लंडने महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १३७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. आता अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. इंग्लंडने या स्पर्धेत तीन पराभवांसह सुरुवात केली आणि आता अंतिम फेरी गाठली आहे. इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. यावेळी त्यांनी दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
इंग्लंडचा डाव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ गडी गमावून २९३ धावा केल्या. इंग्लंडकडून डॅनी व्याटने शतक झळकावले. तिने १२५ चेंडूत १२ चौकारांसह १२९ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेसमोर इंग्लंडची सलामीची फळी फार काही करू शकली नसली. मात्र तरी डॅनी आणि सोफिया डंकले यांनी डाव सावरला आणि इंग्लंडला २९३ धावांपर्यंत नेले.
दक्षिण अफ्रिकेचा डाव
इंग्लंडच्या या धावसंख्येसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ ३८ षटकांत १५६ धावांवर आटोपला. इंग्लंडने हा सामना १३७ धावांनी जिंकला. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने ८ षटकात ३६ धावा देत सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजीत मिग्नॉन डू प्रीझने ३० या सर्वाधिक धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन संघ नवव्यांदा महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. २०१७ मध्ये भारताचा पराभव करून इंग्लंडने चौथ्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करून सहावे विजेतेपद पटकावले होते. महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ३ एप्रिल रोजी क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.