आज संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. २१ व्या शतकातली स्त्री ही आज सर्वच क्षेत्रात पुरुषांना टक्कर देत मार्गक्रमण करत आहे. अनेकदा एखाद्या क्षेत्रात स्त्रियांना कारकीर्द घडवताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मात्र पुण्याची बास्केटबॉलपटू श्रुती मेनन या तरुण खेळाडूने शिक्षण आणि खेळ यांची सांगड घालत यशस्वी होता येतं हे दाखवून दिलं आहे. श्रुतीला नुकतच महाराष्ट्र शासनाच्या शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आलं. जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने लोकसत्ता ऑनलाईनने श्रुतीशी संवाद साधत तिचा प्रवास जाणून घेतला.

श्रुती पुण्याच्या गर्ल्स दस्तुर स्कूलची विद्यार्थिनी…शाळेत असल्यापासूनच श्रुती बास्केटबॉल आणि कराटे खेळायची. किंबहुना श्रुतीच्या शाळेचा तो नियमच होता. मात्र पाचवीत असताना श्रुतीच्या मैत्रिणीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यावेळी शाळेच्या प्रशिक्षकांनी तुझी संघात का निवड झाली नाही?? असा प्रश्न विचारत प्रशिक्षकांनी श्रुतीला खडसावलं. यानंतर श्रुतीने स्वतःमध्ये बदल करत, बास्केटबॉलचा नेटाने सराव करण्यास सुरुवात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे अवघ्या २-३ वर्षांच्या कालावधीत श्रुतीला बास्केटबॉलमध्ये देशपातळीवरही खेळण्याची संधी मिळाली. दहावीत असताना श्रुतीच्या अभ्यासावर परिणाम होईल यासाठी शाळेने तिला खेळण्याची परवानगी नाकारली. मात्र यावेळी तिच्या पालकांनी शाळेला हमी दिल्यानंतर श्रुतीला खेळण्याची परवानगी मिळाली. यावेळी श्रुतीने दहावीच्या परिक्षेत चांगले मार्क मिळवलेच याचसोबत स्पर्धेतही चांगली कामगिरी बजावली.

मात्र श्रुतीचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. सुरुवातीला बास्केटबॉल खेळत असताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बास्केटबॉलच्या सरावाला जात असताना शॉर्ट पँट घालून जावं लागत असल्यामुळे आजुबाजूची लोकं तिच्याकडे बघत असायचे. यावेळी आपल्याला खूप अवघडल्यासारखं वाटायचं, असं श्रुतीने सांगितलं. मात्र काळानुरुप लोकांच्या मानसिकतेत बदल होत गेला. काहीवर्षांनी श्रुतीची बास्केटबॉलमधली कामगिरी पाहिल्यानंतर तिला रेल्वेकडून नोकरीची संधी मिळाली. श्रुतीनेही या संधीचा स्विकार करत सरावाला सुरुवात केली. रेल्वेचा राष्ट्रीय संघ मुंबईत सराव करत असल्यामुळे श्रुतीला रोज पुणे-मुंबई प्रवास करायला लागायचा. यावेळी आपल्या पालकांनी खूप मोलाचा आधार दिल्याचंही श्रुतीने नमूद केलं. यापुढेही भारतीय संघाकडून खेळण्याची श्रुतीची इच्छा कायम असून, भविष्यकाळात आगामी पिढीला मार्गदर्शन करण्यास तयार असल्याचं श्रुतीने नमूद केलं.

Story img Loader