भारत-द. कोरिया हॉकी मालिका
नवनीत, लालरेमसियामीच्या गोलमुळे दक्षिण कोरियावर २-१ अशी मात
भारतीय महिला हॉकी संघाने यजमान दक्षिण कोरियाचा पहिल्या सामन्यात २-१ असा पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत दमदार प्रारंभ केला आहे.
युवा आक्रमक लालरेमसियामी (२०व्या मिनिटाला) आणि नवनीत कौर (४०व्या मिनिटाला) यांनी भारताचे गोल केले, तर शिन हायीजिआँगने (४८व्या मिनिटाला) कोरियाकडून एकमेव गोल केला. वर्षांच्या पूर्वार्धात स्पेन आणि मलेशियाविरुद्ध दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने कोरियाविरुद्धही आपली छाप पाडली.
पहिल्या सत्रात पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल साकारण्याची संधी भारताने गमावली. परंतु लालरेमसियामीने २०व्या मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करीत भारताचे खाते उघडले. मग नवनीत भारताच्या खात्यावर दुसरा गोल जमा केला.
कोरियाला पाच पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. परंतु फक्त अखेरच्या प्रयत्नात शिनने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यामुळे ४८व्या मिनिटाला त्यांना खाते उघडता आले. अनुभवी गोलरक्षक सविताने अप्रतिम खेळ करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताच्या पहिल्या सामन्यातील निकाल चांगला आहे, परंतु कामगिरी आणखी उंचावण्याची गरज आहे. या सामन्यात आम्ही काही नवे प्रयोग केले. हे बदल कितपत उपयुक्त ठरतात, हे या मालिकेत दिसून येईल.
– शोर्ड मरिन, भारताचे प्रशिक्षक