आशिया चषकातील १५व्या सामन्यात आज भारताने यजमान बांगलादेश समोर १६० धावांचे लक्ष ठेवले होते. सिल्हेट क्रिकेट मैदानावर भारत आणि बांगलादेश संघात खेळला गेला. शफाली वर्माच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान बांगलादेशवर ५९ धावांनी केली मात करत आशिया चषकाची उपांत्य फेरी गाठली. हा सामना जिंकत भारताने गुणतालिकेतील अव्वल स्थान टिकवून ठेवले. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. शफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताच्या १५९ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचे फलंदाज अतिशय संथ गतीने धावा काढत होते. यामुळे सामन्यात भारताची पकड मजबूत झाली. १४ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या दोन बाद ६८ होती. भारताने ठेवलेल्या १६० धावांच्या लक्ष्याच्या बदल्यात बांगलादेशचा संघ केवळ १०० धावाचं करू शकला आणि सामना मोठ्या फरकाने गमावला. महिला आशिया चषक स्पर्धेतील पाच सामन्यांमधला भारताचा हा चौथा विजय असून टीम इंडिया आठ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. गेल्या सामन्यात भारताचा एकमेव पराभव पाकिस्तानविरुद्ध झाला होता. निगर सुलताना हिने बांगलादेशकडून सर्वाधिक ३६ धावा केल्या तर फरगानाने ३० धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा आणि शफाली वर्माने प्रत्येकी २ बळी घेतले. स्नेह राणा आणि रेणुका सिंग यांनी १-१ गडी बाद करत त्यांना साथ दिली.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या. शफाली वर्मा आणि कर्णधार स्मृती मंधाना यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ७२ चेंडूत ९६ धावांची भागीदारी केली. या जोडीने पॉवरप्लेमध्येही ५९ धावा केल्या. मात्र, स्मृती ४७ धावांवर धावबाद झाली. यानंतर भारतीय संघ रुळावरून घसरत गेला. शफाली वर्माही ५५ धावा करून बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमाने २४ चेंडूत ३५ धावा करत संघाला १५० पार पोहचवले, मात्र दुसऱ्या बाजूला ऋचा घोष चार, किरण नवगिरे शून्य आणि दीप्ती शर्मा १० धावा करून बाद झाल्या. अखेरीस, भारताने निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या.
बांगलादेशकडून यावेळी गोलंदाजी करताना रुमाना अहमद हिला सर्वाधिक बळी घेण्यात यश आले. रुमानाने ३ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. याशिवाय फहिमा खातून आणि संजीदा अख्तर यांनीही कमी धावा देत भारताला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. तिच्याव्यतिरिक्त सलमा खातून हिनेही एक गडी बाद करत संघासाठी योगदान दिले.