शनिवार १५ ऑक्टोबर हा दिवस आशियाई क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा आहे. बांगलादेशातील सिल्हेट येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक २०२२ मध्ये शनिवारी निश्चित होणार आहे की आशियाचा नवा चॅम्पियन कोण असेल – भारत की श्रीलंका? हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली ६ वेळचा चॅम्पियन भारतीय संघ सातव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करेल. त्याचबरोबर या स्पर्धेच्या टी२० स्वरूपातील बदलानंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्रीलंकेच्या संघाला विजेतेपदाची सुरुवात करायची आहे.

श्रीलंकेच्या पुरुष संघाने गेल्या महिन्यात आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले होते. अशा स्थितीत महिला संघाला आपल्या देशाला एकंदर आशिया चॅम्पियन बनवण्याची चांगली संधी आहे. पण हे होऊ शकते का? कोण बलवान, कोण दुर्बल? या चर्चेत जाणून घ्या. उपांत्य फेरीत भारताने थायलंडचा आणि श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करत शेवटची फेरी गाठली. याआधी उपांत्य फेरीत टीम इंडियाने थायलंडचा ७४ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यावेळी भारताला फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. साखळी सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, अंतिम फेरीतील दुसरा संघ श्रीलंकेचा असेल. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवत पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला.

टीम इंडियाचे पारडे श्रीलंकेविरुद्ध जड आहे. आतापर्यंत दोन्ही संघ टी२० मध्ये २२ वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यामध्ये भारताने १७ वेळा विजय मिळवला असून श्रीलंकेने फक्त चार सामने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकालच लागला नाही. आशिया चषकातील साखळी सामन्यात भारताने श्रीलंकेला ४१ धावांनी पराभव केला होता. आतापर्यंत आशिया चषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामने झाले असून ते सर्व भारताने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारत सलग आठव्यांदा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. श्रीलंका पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी १४ वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने २००४, २००५-०६, २००६ आणि २००८ या आशिया चषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आहे, मात्र ते सामने एकदिवसीय प्रकारचे होते.

हेही वाचा :   ‘आयसीसी’ला कर सवलत न मिळाल्यास ‘बीसीसीआय’ला ९५५ कोटींचा फटका!

या स्पर्धेतील सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ज्युनियर खेळाडूंनी दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी केली. १८ वर्षीय शेफाली वर्मा (१६१ धावा आणि तीन विकेट), २२ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्स (२१५ धावा) आणि २५ वर्षीय दीप्ती शर्मा (९४ धावा आणि १३ विकेट) या तीन युवा खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारली.

अंतिम सामन्यातील खेळपट्टीचा अहवाल

सिल्हेट क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी या टूर्नामेंटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही तितकीच उपयुक्त ठरली आहे. तसे, या स्पर्धेतील बहुतांश सामन्यांमध्ये संघ मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले आहेत. भारताची फलंदाजी मजबूत आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना एकतर्फी नसून रोमांचक होईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

भारत

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, एस मेघना, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), डेलन हेमलता, स्नेह राणा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, किरण नवगिरे आणि पूजा वस्त्रकार.

श्रीलंका

चमारी अटापट्टू (कर्णधार), निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहरी, अचिनी कुलसूरिया, सुगंधा कुमारी, हर्षिता समरविक्रमा, मधुसिका मेथानंदा, हसिनी परेरा, ओधाडी रणसिंघे, इनोका रणविरा, अनुष्का संजीवनी, मालाना नुशाहनी, कौशानी नुशाहनी, मालाशनी शेंगा.

Story img Loader