आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी२० विश्वचषकाचे नुकतेच वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान एकाच गटात आले आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही स्पर्धा सुरू होणार असून चाहते यासाठी आतापासूनच उत्सुक आहेत. २०२३ मधील महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्या ट्रान्स-टास्मानियन प्रतिस्पर्धी न्यूझीलंड आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत गट अ मध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्याच गटात बांगलादेशचा देखील समावेश आहे,
अलीकडेच टी२० विश्वचषकाची पात्रता फेरी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर या विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारताला पहिला सामना १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. स्पर्धा दोन ग्रुपमध्ये खेळली जाणार असून भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असल्यामुळे चाहत्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे. पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात कॅपटाउनमध्ये खेळला जाईल. विश्वचषकातील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये पार पडेल.
गट दोनमध्ये भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि आयर्लंड यांचा समावेश आहे. गटामध्ये प्रत्येक संघ एकमेकांशी एकदा भिडणार असून सर्वोत्तम प्रदर्शन करणारे दोन संघ उपांत्य सामन्यात पोहोचतील. भारताचा दुसरा सामना वेस्ट इंडीजविरुद्ध १५ फेब्रुवारीला असेल. त्यानंतर भारताचा तिसरा सामना १८ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. २० फेब्रुवारीला आयर्लंड भारतीय महिला संघ चौथा आणि साखळीमधील शेवटचा सामना खेळेल. २१ फेब्रुवारीला साखळीतील सामने संपतील आणि २३ फेब्रुवारीला पहिला उपांत्य सामना केपटाउमध्ये खेळला जाईल. दुसरा उपांत्य सामना २४ फेब्रुवारीला केपटाउनमध्येच आयोजित केला गेला आहे. अंतिम सामना २६ फेब्रुवारी रोजी केपटाउनमध्येच खेळला जाईल.
भारतीय संघाचे विश्वचषकातील सामने
१२ फेब्रुवारी विरूद्ध पाकिस्तान
१५ फेब्रुवारी विरूद्ध वेस्ट इंडिज
१८ फेब्रुवारी विरूद्ध इंग्लंड
२० फेब्रुवारी विरूद्ध आयर्लंड