India Schedule of Womens T20 World Cup 2024: ICC महिला T20 विश्वचषक 2024 चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आता स्पर्धेतील सर्व सामने बांगलादेशऐवजी यूएईमध्ये खेळवले जातील. या स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना २० ऑक्टोबरला होणार आहे. या टूर्नामेंटमध्ये भारतीय संघ कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. आयसीसी टूर्नामेंटमधील बहुप्रतिक्षित सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत होणार आहे, तर वेळापत्रकानुसार टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार असून हा सामनाही दुबईत होणार आहे. तर वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भारताचा संघही घोषित करण्यात आला आहे.
हेही वाचा – Womens T20 WC 2024: भारत पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, ICC ने जाहीर केलं T20 World Cupचे वेळापत्रक
कसा आहे स्पर्धेचा फॉरमॅट?
ICC महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. गट सामन्यांत प्रत्येक संघ ४-४ सामने खेळेल. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. आयसीसीने या स्पर्धेसाठी २ गट तयार केले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना २० ऑक्टोबर रोजी दुबई येथे होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी ‘राखीव दिवस’ ठेवण्यात आला आहे. याआधी सर्व संघ सराव सामने खेळताना दिसणार आहेत.
भारताचा सराव सामना दोन देशांविरूद्ध
महिला टी-२० विश्वचषक खेळणारे सर्व १० संघ प्रत्येकी दोन सराव सामने खेळतील. २८ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि स्कॉटलंड आणि श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यांनी सराव सामन्यांना सुरुवात होईल.
महिला टी-२० विश्वचषकापूर्वी दुबईत दोन सराव सामन्यांमध्ये भारताचा सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २९ सप्टेंबरला भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होईल तर हरमनप्रीत कौरच्या संघाचा सामना १ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेशी होईल.
Womens T20 World Cup 2024: भारतीय महिला संघाचे वेळापत्रक
सराव सामने
२९ सप्टेंबर – भारत वि वेस्ट इंडिज – संध्याकाळी ७.३० वाजता
१ ऑक्टोबर – भारत वि दक्षिण आफ्रिका – संध्याकाळी ७.३० वाजता
४ ऑक्टोबर – शुक्रवार – भारत वि. न्यूझीलंड – दुबई – संध्याकाळी ७.३० वाजता
६ ऑक्टोबर – रविवार – भारत वि. पाकिस्तान – दुबई – दुपारी ३.३० वाजता
९ ऑक्टोबर – बुधवार – भारत विरुद्ध श्रीलंका – दुबई – संध्याकाळी ७.३० वाजता
१३ ऑक्टोबर – रविवार – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया शारजाह – संध्याकाळी ७.३० वाजता
महिला टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी , रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.
ट्रॅव्हलिंग रिजर्व
उमा छेत्री (यष्टीरक्षक), तनुजा कंवर, सायमा ठाकोर.
नॉन ट्रॅव्हलिंग रिजर्व
राघवी बिस्ट, प्रिया मिश्रा