Womens T20 World Cup 2024 Prize Money : महिला टी-२० क्रिकेटमध्ये ८ वर्षांनंतर एका नव्या चॅम्पियनचा जन्म झाला आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदाच महिला टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियन महिला संघाची राजवट संपवली. रविवारी २० ऑक्टोबर रोजी दुबई येथे झालेल्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनल सामन्यात, न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ३२ धावांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर या चॅम्पियन्स संघासह इतर संघांवर बक्षीसांच्या रुपाने पैशाचा वर्षाव झाला. त्यामुळे कोणत्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली जाणून घेऊया.

३ ऑक्टोबर रोजी यूएईमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा समारोप २० ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या फायनल सामन्याने झाला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १२६ धावाच करु शकला. या स्पर्धेतील विजेता न्यूझीलंडला चमकदार विश्वचषक ट्रॉफी मिळाली आणि सुमारे २० कोटी रुपयांचे बक्षीसही मिळाले. त्याचबरोबर उपविजेता दक्षिण आफ्रिकेलाही १० कोटी रुपये मिळाले. त्याचबरोबर पहिल्या फेरीतू बाहेर पडलेल्या टीम इंडियालाही काही रक्कम मिळाली.

वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंड मालामाल –

या विजयासह, न्यूझीलंडला पहिल्यांदाच महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुंदर ट्रॉफी मिळाली, पण केवळ ट्रॉफीच नाही, तर न्यूझीलंडला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ होण्याचे जबरदस्त बक्षीसही मिळाले. आयसीसीने यावेळी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत दुप्पट वाढ केली होती. ज्यामुळे चॅम्पियन न्यूझीलंडला २.३४ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १९.६७ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही चॅम्पियन संघाला मिळालेली ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. याशिवाय ग्रुप स्टेजमधील एक सामना जिंकणाऱ्या प्रत्येक संघाला २६.१९ लाख रुपये दिले. न्यूझीलंडने ग्रुप स्टेजमध्ये ३ सामने जिंकले होते, त्यामुळे त्याला ७८ लाख रुपये अतिरिक्त मिळाले. अशा प्रकारे न्यूझीलंडला सुमारे २०.४५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाली.

हेही वाचा – SA vs NZ : क्रिकेट जगताला मिळाला नवा विश्वविजेता! न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत पटकावलं पहिलं जेतेपद

दक्षिण आफ्रिका आणि भारताला किती रक्कम मिळाली?

उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला १.१७ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ९.८३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. दक्षिण आफ्रिकेनेही ग्रुप स्टेजमध्ये ३ सामने जिंकले होते. त्यामुळे त्याला ७८ लाख रुपये अतिरिक्त मिळाले. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा संघ एकूण १०.६२ कोटी रुपये घेऊन गेला आहे. टीम इंडियाबद्दल बोलायचे, तर स्पर्धेतील त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे रकमेवरही परिणाम झाला. भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडला होता. मात्र, टीम इंडियाने आपल्या ग्रुपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत केले होते. हे दोन सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाला फक्त ५२ लाख रुपये मिळाले. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर राहिल्यामुळे ४ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळाले.