भारताच्या विजयी अंडर-१९ विश्वचषक संघाचा भाग असलेले शफाली आणि ऋचा बुधवारी अहमदाबादमध्ये त्यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित होते. त्या आता पुन्हा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार्या वरिष्ठ महिला टी२० विश्वचषकाचे ठिकाण असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला परतण्याच्या मार्गावर आहेत. यावेळी हसत हसत शफाली वर्मा ऋचा घोषच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, “अब वरिष्ठ विश्वचषक विजेतेपद जीतना है, ऋचा” (ऋचा, आता वरिष्ठ विश्वचषक विजेतेपद जिंकण्याची वेळ आली आहे)
भारताचा वरिष्ठ महिला टी२० संघाचा १२ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी सामना होणार आहे. बुधवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शफालीच्या नेतृत्वाखालील भारताच्या विजयी महिला अंडर-१९ संघाचा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, बीसीसीआय सचिव जय शाह आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारताच्या अंडर १९ संघाने विजेतेपदाच्या लढतीत इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव करून महिला अंडर १९ चा पहिलावहिला विश्वचषक जिंकला. या सत्कार समारंभात त्यांना ५ कोटी रुपयांचा चेक देण्यात आला. तसेच भारताचा डाव संपल्यानंतर महिला संघाने एका ओपन असणऱ्या गाडीतून मैदानाला फेरी मारली आणि तेथील उपस्थित सर्व चाहत्यांचे आभार मानले.
अहमदाबादला जाण्यापूर्वी यष्टिरक्षक फलंदाज ऋचाने दक्षिण आफ्रिकेतून टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते की, “शफालीने संघाचे उत्कृष्ट नेतृत्व केले. तिने संघात आत्मविश्वास वाढवला. प्रत्येक सामन्यापूर्वी ती नेहमी म्हणायची ‘चिंता मत करो, हम जीतेंगे’ (काळजी करू नका, आम्ही जिंकू). तिच्या शब्दांनी आम्हाला चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन दिले. आम्ही विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत कारण विश्वचषक विजेता होण्याची भावना अजून मनात कायम आहे. ही आमची सुरुवात आहे. मला खात्री आहे की भविष्यात भारतीय संघ अशीच विजयी घोडदौड सुरू ठेवेल.”
भारताचा असा दबदबा होता की संपूर्ण अंडर१९ विश्वचषकात फक्त एक सामना गमावला होता. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केल्यानंतर, स्पर्धेतील आघाडीची धावा करणाऱ्या श्वेता सेहरावतच्या ५७ चेंडूत नाबाद ९२ धावांच्या जोरावर भारताने यूएईला १२२ धावांनी धूळ चारली आणि नंतर स्कॉटलंडचा ८३ धावांनी पराभव केला.
केवळ एक सामना ऑस्ट्रेलियाकडून ७ विकेटने पराभूत झालेल्या भारताने श्रीलंकेवर ७ गडी राखून सर्वसमावेशक विजय नोंदवून न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरी गाठली. सेमीफायनल ही भारतीय तरुण खेळाडूसाठी जवळजवळ स्वप्न होते ज्यामध्ये त्यांनी न्यूझीलंडला ८ गडी राखून पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला. शफाली आणि कंपनीसाठी अंतिम सामना पूर्णपणे एकतर्फी होता. त्यांनी पॉचेफस्ट्रूममधील सेनवेस पार्क येथे इंग्लिश खेळाडूंना ६८ धावांत बाद करून इंग्लंडवर ७ गडी राखून सहज विजय मिळवला.
शफाली आणि तिच्या टीमने भारताची वरिष्ठ कर्णधार हरमनप्रीत कौरशी संवाद साधला होता. याबाबत सांगताना ऋचा म्हणते, “ हा विश्वचषक जिंकल्यामुळे आम्हाला वरिष्ठ खेळाडूंचा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणादायी ठरेल. होय, अंडर१९ विश्वचषक पूर्ण झाला आहे, आता वरिष्ठ विश्वचषकाची वेळ आली आहे. मला विश्वास आहे की, शफालीप्रमाणेच हरमनप्रीत दीदी भारताला विजेतेपदापर्यंत घेऊन जाईल. अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी हरमनप्रीत दीदी म्हणाली ‘मुलींनो,जा आणि घेऊन या’. तिने फायनलपूर्वी काही टिप्स दिल्या. ती एक अनुभवी खेळाडू आहे आणि तिला फायनल खेळणे म्हणजे काय हे माहित आहे. मी आता आगामी विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहे.”