वरिष्ठ गटाचे राष्ट्रीय विजेतेपद मी पुण्यातील स्पर्धेत जिंकले आणि तेव्हापासूनच माझी बॅडमिंटन कारकीर्द खऱ्या अर्थाने घडली, त्यामुळे पुण्याचे ऋण माझ्यावर खूप मोठे आहे, असे माजी ऑल इंग्लंड विजेते व बॅडमिंटनचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी येथे सांगितले.पुणे जिल्हा व महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनांचे संस्थापक कै. दाजीसाहेब नातू यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त यंदा विविध स्पर्धा व उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्याचाच उद्घाटनाचा समारंभ गोपीचंद यांच्या हस्ते व ज्येष्ठ गिर्यारोहक आबासाहेब महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे व सचिव उदय साने उपस्थित होते. गोपीचंद यांनी सांगितले, महाराष्ट्रात बॅडमिंटनसाठी विपुल नैपुण्य उपलब्ध आहे. या नैपुण्याच्या विकासाकरिता अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांची वानवा आहे. हे लक्षात घेऊनच मी प्रशिक्षकांकरिता कार्यशाळा आयोजित करण्याचा विचार करीत आहे. आपल्या देशात प्रशिक्षकांना अपेक्षेइतका सन्मान ठेवला जात नाही. बॅडमिंटन संकुलाची देखभाल करणाऱ्या सपोर्ट स्टाफ, प्रशासकीय अधिकारी यांच्यापेक्षा प्रशिक्षकास कमी महत्त्व दिले जाते. खेळाडूंच्या दर्जावर प्रशिक्षकाचा दर्जा ठरविला जातो. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती. परदेशात अनेक खेळांमध्ये गुरुकुल पद्धत आहे मात्र आपल्याकडे प्रशिक्षकांना दुय्यम स्थान दिले जाते. प्रशिक्षकांचा दर्जा उंचावण्यासाठी योग्य वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे.ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर खेळाचे ऋण जपण्यासाठी मी हैदराबाद येथे बॅडमिंटन अकादमी सुरू केली. त्यामधून मी अनेक आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडू निर्माण करू शकलो ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची कामगिरी आहे असे सांगून गोपीचंद म्हणाले, चीन ओपन स्पर्धेत पुरुष व महिला एकेरीत भारतीय खेळाडूंनी विजेतेपद मिळविल्यानंतर तेथे तिरंगा ध्वज दोन वेळा उंचावला गेला, हा माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय क्षण होता. आता ऑलिम्पिकमध्ये त्याची पुनरावृत्ती होण्याची मी वाट पाहत आहे.
मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत असतानाच त्याच वेळी माझ्या अकादमीतही मी शिकवीत असतो. मात्र दोन्ही भूमिकांमध्ये तडजोड करताना मी कायमच देशहितास प्राधान्य दिले आहे. दुर्दैवाने माझ्यावर विनाकारण टीका केली जात असते. मात्र माझ्यापूर्वी असलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षकांच्याही अकादमी होत्या. मी दोन्ही भूमिका पार पाडत असताना कायमच संघ निवड, शासकीय अनुदानाकरिता खेळाडूंची निवड याबाबत पारदर्शकता जपली आहे, असेही गोपीचंद यांनी सांगितले. वरिष्ठ गटात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणाऱ्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर जे प्रशिक्षक प्राथमिक स्तरावर व प्रगतिपथावरील खेळाडू तयार करीत असतात, अशा प्रशिक्षकांसाठीही द्रोणाचार्य पुरस्कार दिला पाहिजे, अशी सूचनाही गोपीचंद यांनी केली.  कनिष्ठ गटातील खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धासाठी अनेक दिवसांचा प्रवास करावा लागतो, त्यासाठी त्यांचा शिक्षणाचा वेळ वाया जातो. स्पर्धेच्या प्रवासावर खूप खर्च करावा लागतो. हे लक्षात घेऊन अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धाच्या स्वरूपात बदल करण्यासाठी मी बॅडमिंटन संघटना व शासकीय पदाधिकारी यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे, असेही गोपीचंद यांनी सांगितले. महाराष्ट्रात बॅडमिंटनचा प्रसार व्हावा यासाठी कै.दाजीसाहेब नातू यांनी अपार कष्ट घेतले, त्यामुळेच राज्यात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. पुण्यात अनेक दूरच्या ठिकाणी सायकलवरून प्रवास करीत दाजीसाहेब यांनी बॅडमिंटनसाठी आर्थिक निधी उभा केला व संघटनेला सक्षम केले असे आबासाहेब महाजन यांनी सांगितले.

Story img Loader