करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवल्यामुळे आता बीसीसीआयने आयपीएल अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलायचं ठरवलं आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला अंदाजे ३ हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. याचसोबत सामन्यांचं प्रक्षेपण करणारी स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि प्रत्येक संघमालकांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यासाठीच बीसीसीआय आयपीएल यंदाच्या वर्षाअखेरीस खेळवता येईल का याची चाचपणी करत आहे. यामध्ये सप्टेंबरमध्ये होणारा आशिया चषक पुढे ढकलत त्या काळात छोटेखानी स्वरुपात आयपीएल खेळवता येईल का याचाही विचार सुरु होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी मात्र कठोर पवित्रा घेत आयपीएलसाठी आशिया चषक रद्द होणार नाही असं बजावलं आहे. यंदाच्या आशिया चषकाच्या यजमानपदाचे हक्क हे पाकिस्तानला देण्यात आलेले आहेत. “आयपीएलसाठी आशिया चषक रद्द करायला आम्ही कधीही तयार होणार नाही. आयपीएलसंदर्भात बातम्या आणि चर्चा मी ऐकतो आहे, पण एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आशिया चषकाचं आयोजन करायचं की नाही हे फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्या हातात नाही. इतर देशांचं मतही यात तितकच महत्वाचं आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आल्यास आशिया चषकाचं आयोजन होणं गरजेचं आहे. कारण आशियाई क्रिकेट परिषदेशी संलग्न असलेल्या अनेक देशांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून निधी येण्यास सुरुवात होऊ शकते.” एहसान मणी यांनी पाक क्रिकेट बोर्डाची भूमिका स्पष्ट केली.

आशिया चषकाच्या यजमानपदाचे हक्क पाकिस्तानला गेल्यामुळे भारत या स्पर्धेत सहभागी होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क पाकिस्तानकडेच ठेवत स्पर्धा पाकिस्तानऐवजी दुबईत भरवण्याचा पर्याय पुढे आला होता. मात्र सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आशिया चषकाचं आयोजनही ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होईल की नाही हे सांगणं कठीण असल्याचं मणी यांनी स्पष्ट केलं.