भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केलं. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं.
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी स्पर्धेतील निकालावर समाधानी असून देशासाठी पदक जिंकल्याचा आनंद आहे, असं त्यानं म्हटलं आहे. तसेच पुढच्या जागतिक स्पर्धेत यापेक्षा उत्तम कामगिरी करू, असा विश्वासही त्यानं यावेळी व्यक्त केला.
रौप्य पदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना नीरज चोप्रा म्हणाला, “हवामान अनुकूल नसताना आणि वाऱ्याचा वेग खूप जास्त असताना, मी चांगली कामगिरी करेन, याची मला खात्री होती. मी निकालावर समाधानी आहे. माझ्या देशासाठी पदक जिंकू शकलो, याचा मला आनंद आहे.”
त्यानं पुढे म्हटलं, “पुढच्या वर्षी होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये मी अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि परदेशात सरावासाठी परवानगी दिल्याबद्दल मी SAI, TOPS, अॅथलेटिक्स फेडरेशन आणि भारत सरकारचे आभार मानतो. मला आशा आहे की इतर खेळांनादेखील असाच पाठिंबा मिळेल, जेणेकरून आम्ही भारत देशाची मान अभिमानाने उंचावू.”