जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपला चांगला फॉर्म कायम ठेवला आहे. पहिल्या दिवशी किदम्बी श्रीकांतने आपला सलामीचा सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या दिवशी रिओ ऑलिम्पीकमध्ये रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू आणि पुरुष खेळाडूंमध्ये साई प्रणीत या खेळाडुंनी आपल्या पहिल्या फेरीचे सामने जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधूने आपल्या कोरियन प्रतिस्पर्ध्यावर २१-१६, २१-१४ अशी मात केली.
पहिल्या फेरीत सिंधूची लढत कोरियाच्या किम ह्यो मिन विरुद्ध होता. या संपूर्ण सामन्यात सिंधूने आपलं वर्चस्व राखलं होतं. पहिल्याच सेटमध्ये सिंधूने आघाडी घ्यायला सुरुवात केली. सिंधूने पहिल्याच सेटमध्ये किमला बॅकफूटवर ढकलत ८-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे सामन्यातला पहिलाच सेट एकतर्फी होणार असं वाटत असताना किमने सिंधूची सर्विस मोडली. यानंतर किम ह्यो मिनने सिंधूला लढत देण्याचा प्रयत्न केला खरा मात्र आपल्या अनुभवाचा फायदा घेत सिंधूने सामन्यात ६ गुणांची आघाडी कायम ठेवली होती. मात्र अखेरच्या क्षणात किम ह्यो मिनने सिंधूला चांगली टक्कर दिली. काही सुरेख पॉईंट मिळवत किमने आघाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर सिंधूने किमला सामन्यात फारसं डोकं वर काढण्याची संधी न देता पहिला सेट २१-१६ अशा फरकाने आपल्या खिशात घातला.
दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला पहिल्या मिनीटापासूनच किमने चांगली लढत दिली. दुसऱ्या सेटमध्ये सिंधू आणि किमच्या गुणांमध्ये अवघ्या २-३ गुणांचं अंतर होतं. मात्र सुरुवातीपासूनची लढत मोडून काढत सिंधूने सामन्यात आघाडी घेतली. आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूकडे ११-८ अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने मागे वळून न पाहता दुसरा सेटही २१-१४ अशा फरकाने जिंकत सामना आपल्या खिशात घातला.
याव्यतिरीक्त साई प्रणित, समीर वर्मा, तन्वी लाड आणि ऋतुपर्णा दास या भारतीय खेळाडूंनी आपल्या पहिल्या फेरीचे सामने जिंकले आहेत.