भारताच्या मदनलालला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. ५२ किलो वजनी गटात मोल्डोव्हााच्या अ‍ॅलेक्झांडर रिस्कान याने त्याला ३-० असे हरवले.
मदनलालने सुरुवात चांगली केली होती मात्र नंतर रिस्कानच्या आक्रमक चालींपुढे त्याचा बचाव निष्प्रभ ठरला. या स्पर्धेत प्रथमच नवीन गुणांकन पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच प्रथमच या स्पर्धेत खेळाडू कोणतेही सुरक्षाकवच न घालता कोर्टवर खेळत आहेत.
भारताच्या विकास मलिक याला ६० किलो गटात किर्गिझस्तानच्या मेदेर मामाकिव्ह याच्याशी खेळावे लागणार आहे. भारताने दहा खेळाडूंचा संघ या स्पर्धेसाठी पाठवला असून अव्वल बॉक्सर शिवा थापा (५६ किलो)व मनोज कुमार (६४ किलो) यांना अनुक्रमे चौथे व सहावे मानांकन मिळाले आहे. त्यांच्यासह भारताच्या पाच खेळाडूंना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.
भारतीय बॉक्सिंग महासंघावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या ध्वजाखाली सहभागी झाले आहेत.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंगने या स्पर्धेत २००९मध्ये कांस्यपदक मिळविले होते. तो या स्पर्धेत चौथ्यांदा सहभागी झाला आहे. विकास कृष्णन याने २०११मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.
आजपर्यंतच्या इतिहासात भारताने दोन पदकांची कमाई केली आहे. या वेळी या स्पर्धेत १०० देशांचे ४५० हून अधिक बॉक्सर सहभागी झाले आहेत.

Story img Loader