पीटीआय, चेन्नई
वयाच्या १८ व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर मायदेशी पाऊल ठेवताच जागतिक लढतीत मानसिक आणि भावनिक दडपणाचा सामना करणे आव्हानात्मक होते, असे डी. गुकेशने सांगितले. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात तरुण विजेता ठरलेला भारतीय बुद्धिबळपटू गुकेश सोमवारी मायदेशात दाखल झाला. लगेचच आपल्या मूळ शहराकडे चेन्नईतही पोहचला. चाहत्यांनी उत्स्फूर्तपणे त्याचे स्वागत केले.
मायदेशातील पत्रकारांशी प्रथमच संवाद साधताना गुकेशने सर्वांचे आभार मानले. ‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत केवळ बुद्धिबळ खेळणे महत्त्वाचे नव्हते, तर मानसिक आणि भावनिक दडपणावर मात करून पटावरील आव्हानांना सामोरे जायचे असते. यासाठी मला मानसोपचारतज्ज्ञ म्हणून पॅडी अप्टॉन यांची खूप मदत झाली,’’ असे गुकेश म्हणाला. चेन्नईत परतल्यावर सर्वात प्रथम गुकेशचा गौरव त्याच्या बालपणीच्या शाळेत वेलमल विद्यालयात करण्यात आला. त्यानंतर तेथेच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
‘‘जागतिक विजेतेपदाच्या या १४ फेऱ्यांच्या लढतीत अप्टॉन सतत माझ्याबरोबर होते. त्यांनी केलेल्या सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. त्यांचे संभाषण माझ्यातील खेळाडू म्हणून विकासासाठी खूप निर्णायक होते,’’ असेही गुकेश म्हणाला.
‘‘जागतिक विजेतेपदाची लढत खेळणार म्हटल्यावर मी तातडीने मानसोपचारतज्ज्ञाबद्दल विचारणा केली. तेव्हा संदीप सिंघल यांनी अप्टॉन यांच्याशी भेट घडवून आणली. माझ्या यशात अप्टॉन यांचा वाटा निश्चित मोठा आहे,’’ असे गुकेश म्हणाला.
‘‘भारतात विजेतेपदाचा करंडक आणणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या पाठिंब्याशिवाय मी ही मजल मारू शकलो नसतो. तुमच्या या उस्फूर्त स्वागतानेही भारावून गेलो आहे. आता पुढील काही दिवस एकत्र राहून विजेतेपदाचा आनंद साजरा करू या,’’ असेही गुकेश म्हणाला.
चेन्नईत उत्स्फूर्त स्वागत
जागतिक बुद्धिबळ विजेतेपद मिळवून मायदेशात परतलेल्या डी.गुकेशचे विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्याच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर चाहत्यांची गर्दी उसळली होती. विमानतळावर तमिळनाडू सरकार आणि राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे पदाधिकारी त्याच्या स्वागतासाठी एका रांगेत उभे होते. तमिळनाडूच्या क्रीडा प्राधिकरण आणि वेलमल विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले. बाहेर प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी गुकेश आला, तेव्हा त्याला जवळून पाहण्यासाठी आणि त्याची छबी टिपण्यासाठी चाहते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यात चांगलीच स्पर्धा लागली होती. चाहत्यांना अभिवादन केल्यानंतर सजवलेल्या गाडीतून गुकेश घरी रवाना झाला.