भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने यूजीन येथे जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. त्यामुळे सध्या त्याच्यावर कौतुकचा वर्षाव होत आहे. आज (२४ जुलै) यूजीने येथे झालेल्या अंतिम फेरीमध्ये भारतीय नीरज सोबतच पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम देखील खेळत होता. नदीमला आपल्या देशासाठी पदक मिळवता आले नाही. त्यानंतर निराश झालेल्या नदीमची भारताच्या नीरजने विचारपूस केली. नीरजच्या या खिलाडू वृत्तीचेही कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानच्या नदीमने ८६.१६मीटर भाला फेकडून पाचवे स्थान मिळवले. अंतिम फेरी संपल्यानंतर स्वत: नीरजने दोघांमधील संवाद उघड केला आहे. नीरज म्हणाला, “स्पर्धा संपल्यानंतर मी अर्श नदीमशी बोललो. त्याने चांगला खेळ केला, असे मी त्याला सांगितले. तो हाताच्या कोपराच्या दुखापतीचा सामना करत असल्याचे त्याने सांगितले. तरी देखील त्याने शानदार कामगिरी केली म्हणून मी त्याचे अभिनंदन केले. दुखापत असूनही ८६ मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकने हे कौतुकास्पद आहे.”

हेही वाचा – World Athletics Championship: ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं दिली प्रतिक्रिया, म्हणाला “हवामान अनुकूल नसूनही…”

भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यापूर्वी अंतिम फेरीमध्ये एकत्र खेळले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या जकार्ता आशियाई खेळादरम्यान दोघांनीही पदके मिळवली होती. इतकेच नाहीतर त्यांनी व्यासपीठावर एकमेकांना शुभेच्छाही दिल्या होत्या. तेव्हा दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हेही वाचा – २०२३ विश्वचषकानंतर हार्दिक पंड्या होणार निवृत्त? रवि शास्त्रींचे मोठे वक्तव्य

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केले. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World championship 2022 neeraj chopra reveals conversation with pakistan arshad nadeem after final vkk