आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीत भारताचा बॉक्सिंगपटू शिवा थापा याने ५६ किलो वजनी गटात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. गेल्या महिन्यात दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत शिवाने कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळेच त्याने १५५० गुणांसह पाच स्थानांची भरारी घेतली. आर्यलडचा मिचेल कोनलॅन (२१५० गुण) अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याने जागतिक स्पध्रेत सुवर्णपदक जिंकले होते.
विजेंदर सिंग (२००९, कांस्य) आणि विकास कृष्णन (२०११, कांस्य) यांच्यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत पदक जिंकणारा शिवा तिसरा भारतीय खेळाडू आहे. दोहा येथील स्पध्रेत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झालेला विकास ७५ किलो मिडलवेट विभागात सहाव्या स्थानावर आहे. सुपर हेव्हीवेट गटात (९१ किलोवरील) सतीश कुमार सातव्या स्थानी, तर ४९ किलो वजनी गटात एल. देवेंद्रो १३व्या स्थानी आहे. त्यानंतर आशियाई स्पध्रेतील सुवर्णपदक विजेता सुमीत सांगवान ८१ किलो वजनी गटात १८व्या, तर ६४ किलो वजनी गटात मनोज कुमार १८व्या स्थानावर आहे.

Story img Loader