वृत्तसंस्था, सिंगापूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यामान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारतीय आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील शनिवारी झालेला पाचवा डावही बरोबरीत सुटला. सलग दुसऱ्यांदा डिंग आणि गुकेशने बरोबरीवर समाधान मानल्याने एकूण १४ डावांच्या या लढतीत आता २.५-२.५ अशी बरोबरी झाली आहे. दोघेही जगज्जेतेपदापासून पाच गुण दूर आहेत.

पाचव्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना गुकेशची कामगिरी निराशाजनक ठरली. डावाच्या मध्यात तो पराभवाच्या छायेत होता. त्याच्याकडून मोठी चूकही झाली. मात्र, याचा फायदा करून घेण्यात डिंग अपयशी ठरला आणि ४० चालींनंतर हा डाव बरोबरीत सुटला. डिंगने या लढतीतील पहिल्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळताना विजय नोंदवला होता. त्यानंतर मात्र त्याला एका पराभवाचा सामना करावा लागला, तर तीन वेळा बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे.

हेही वाचा >>>IND vs PAK: भारताविरूद्ध खेळतोय पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा मुलगा, अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजीत केली शानदार कामगिरी; नेमका आहे तरी कोण?

‘‘मला वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी होती, पण याचा फायदा करून घेण्यात मी कमी पडलो,’’ असे पाचव्या डावानंतर डिंगने मान्य केले.

दुसरीकडे, डावाच्या मध्यात झालेल्या चुकीबाबत विचारले असता गुकेश म्हणाला, ‘‘डाव असाही बरोबरीतच सुटणार होता. माझ्याकडून चूक कशी झाली हे कळलेच नाही. मी अडचणीत सापडलो होतो, पण त्यानंतर मी चांगला खेळ करू शकलो याचे समाधान आहे.’’ तसेच एकंदर कामगिरीबाबत तो आनंदी होता. ‘‘पहिला डाव गमावल्यानंतर मी ज्या प्रकारे पुनरागमन केले, त्याने आनंदी आहे,’’ असे गुकेशने सांगितले.

पाचव्या डावात गुकेशने पुन्हा राजाच्या प्याद्याने सुरुवात केली आणि जगज्जेतेपदाच्या लढतीत दुसऱ्यांदा त्याला फ्रेंच बचावाचा सामना करावा लागला. गुकेशने पहिला डाव अशाच सुरुवातीनंतर गमावला होता. पाचव्या डावात गुकेशने बचावात्मक पवित्रा अवलंबताना एक्सचेंज प्रकार निवडला, पण डिंग यासाठी पूर्णपणे तयार होता. दोन्ही खेळाडूंनी वजिरांची अदलाबदल केली. त्यानंतर हत्तींचीही अदलाबदल झाली. त्यामुळे पटावरील स्थिती समान राहिली. मात्र, यानंतर गुकेशने आपल्या नैसर्गिक शैलीप्रमाणे आक्रमक चाली रचण्यास पसंती दिली. या वेळीच त्याच्याकडून चूक झाली.

हेही वाचा >>>IND vs AUS : ‘लबूशेनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करा…’, ॲडलेड कसोटीपूर्वी मिचेल जॉन्सनची मागणी; म्हणाला, ‘कोणाला बळीचा बकरा…’

गुकेशला उंटाचा वापर करून डिंगवर दडपण आणण्याची संधी होती. मात्र, तो योग्य चाली रचण्यात अपयशी ठरला आणि अडचणीत सापडला. डिंगला या वेळी वरचढ ठरता आले नाही. मग गुकेशने भक्कम बचाव करताना डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.

पाचव्या डावात पांढऱ्या सोंगट्यांकडून खेळताना गुकेशने डिंगच्या फ्रेंच बचावाविरुद्ध एक्सचेंज प्रकार निवडला, त्या वेळी ‘गुकेशच्या शैलीला अनुकूल अशी ही पद्धत नाही,’ अशी प्रतिक्रिया २५ वर्षे जगातील अग्रक्रमी महिला म्हणून राज्य केलेल्या जुडिथ पोलगारने व्यक्त केली. खरोखरच गुकेशने अगम्य खेळ्या करून कठीण परिस्थिती आणली होती. निव्वळ तारेवरची कसरत करून गुकेशने डाव वाचवला. गुकेशचा आवडता खेळाडू आणि माजी विश्वविजेता बॉबी फिशरला तो गुकेशच्या वयाचा असताना फ्रेंच बचावाने सतावले होते. अपार मेहनतीने बॉबीने फ्रेंच बचावाला वरचढ होऊ दिले नव्हते. आता गुकेशला असेच काही करावे लागणार आहे. अन्यथा त्याने राजाच्या प्याद्याने सुरुवात करणे तरी टाळले पाहिजे. – रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World championship chess tournament ding and dommaraju gukesh draw sports news amy